कोल्हापूर : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी (२५ ऑगस्ट) रोजी पी. एन. पाटील गटाचा प्रवेश निश्चित झाला आहे. तथापि, करवीर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाटील गत म्हणून लढण्यावर आम्ही ठाम आहोत, असे मत जिल्हा काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यांची ही भूमिका पाहता आगामी काळात करवीर विधानसभा मतदारसंघात जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष पी. एन. पाटील यांचा गट आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यातील संघर्ष कायम राहण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पी. एन. पाटील गटाचा प्रभाव कायम राहिला. त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून वीस वर्षे काम केले. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी लढवली. विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर पी एन पाटील गटाच्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचे आर्थिक प्रश्न ऐरणीवर आले. यादरम्यान राहुल पाटील यांनी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेसाठी निमंत्रित केले. दोघांमध्ये भेट झाल्यानंतर राहुल पाटील व राजेश पाटील या बंधूंनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले त्यानुसार आता २५ ऑगस्ट रोजी अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये सडोली , तालुका करवीर येथे पक्षप्रवेश निश्चित झाला असल्याचे राहुल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, भोगावती साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणी सोडवण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून भोगावती कारखान्याला अर्थसहाय्य मिळवून ते देणार आहेत. तसेच पी. एन. पाटील गटाला राजकीय सहाय्य ते करणार आहेत. पूर्वी दिवंगत नेते विलासराव देशमुख हे पी. एन. पाटील गटाचे आधारस्तंभ होते. आता ती भूमिका अजित पवार हे निभावणार आहेत, असेही राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नेते यांच्याकडून मदत झाली नाही का, असा प्रश्न उपस्थित केला असता राहुल पाटील म्हणाले, अशी कोणतीही परिस्थिती आली नव्हती. काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मदत केली होती. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनीही भोगावती कारखान्याला अर्थसहाय्य मिळावे यासाठीही पाठपुरावा केला होता.
पी. एन. पाटील यांच्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये मोठा आधार उरला नाही. कार्यकर्त्यांकडून ही खदखद व्यक्त होती. त्यानुसार गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यानंतर त्यांचे मत आजमावून घेतले. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले असल्याचे राहुल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.