जिल्ह्यात मंगळवारी सर्वत्र पावसाने आपली हजेरी लावली असून घटप्रभा व कोदे ही २ धरणे पूर्ण भरली आहेत. राजाराम बंधाऱ्यात आज पाणीपातळी जवळपास स्थिर राहिली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चंदगड तालुक्यात सर्वाधिक ७४.६६ मि.मी. पावसाची नोंद झाली.
मंगळवारी जिल्हय़ात एकूण ४१० मि.मी. पाऊस पडला आहे, तर त्याची सरासरी ३४.१ इतकी आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व िशगणापूर हे सात बंधारे पाण्याखाली आहेत तर भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, शिरगाव, खडक कोगे व सरकारी कोगे हे पाच बंधारे पाण्याखाली असून एकूण १२ बंधारे पाण्याखाली आहेत.
घटप्रभा धरण पूर्णत: भरले आहे, तर कोदे धरण ९५ टक्के भरले असून या भागातील पावसाचा जोर पाहता ते कधीही भरू शकते, असे सांगण्यात आले. घटप्रभा धरणातून प्रतिसेकंद १०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती नद्यांचे पाणी परिसरातील शेतात विस्तीर्ण पसरले आहे.
जिल्ह्याच्या पूर्वेकडील शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण नेहमीप्रमाणे कमी आहे. मात्र येथे पाणलोट क्षेत्रातील पाणी वाहून येत असते. त्यामुळे पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले असून, नदीकाठावरील चाऱ्याचे गवत पाण्याखाली गेले आहे. पंचगंगा नदीवरील तेरवाड व शिरोळ बंधारा पाण्याखाली गेला आहे.
कुरुंदवाडलगत असलेल्या अनवडी पुलावरूनही पाण्याचा विसर्ग होत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.
कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने राजापूर-गुगुळ (कर्नाटक) मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.