कोल्हापूर : दौलत साखर कारखान्याचे कर्ज प्रकरण, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ, ओल्या दुष्काळामुळे शेतीला बसलेला फटका, सेवा संस्थांना व्याजात सवलत यांसारख्या मुद्द्यांवरून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोमवारच्या सभेत संस्था सभासदांनी वातावरण चांगले तापवले. सभेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समयोचित उत्तर देत सभा हाताळली. दरम्यान या वेळी राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी करावी, असा ठराव मंजूर करण्यात येत असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा बँकेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. विविध संस्थांच्या सभासदांनी बँकेच्या कामकाजाविषयी प्रश्न उपस्थित करीत संचालक मंडळाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

दौलतची कर्जफेड करणार

चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. त्यावर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने कर्ज वसुली सुरू केली आहे. त्या अंतर्गत या कारखान्याला जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा केला असल्याने वसुली करण्यात यावी, अशी मागणी कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक गोपाळराव पाटील, ब्लॅक पँथरचे जिल्हाध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह अनेकांनी केली. त्यावर अध्यक्ष मुश्रीफ यांनी याप्रकरणी दौलत कारखाना चालवायला दिलेल्या अथर्व कंपनीच्या कार्यकारी संचालकांनी जिल्हा बँकेकडे एकरकमी कर्जफेड करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामध्ये तोडगा निघाला नाही तर जिल्हा बँक हे कर्ज स्वतः भरणार असल्याचे स्पष्ट केले.

सरसकट कर्जमाफीचा ठराव

गगनबावडा येथील विलास पाटील यांनी पावसाचा जबर फटका बसल्याने पश्चिमेकडील तालुक्यातील कर्जमाफी करण्याची मागणी केली. त्यावर मुश्रीफ यांनी राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी करावी, असा ठराव मंजूर करण्यात येत असल्याचे सांगितले.

कोल्हापुरात शक्तिपीठ थांबला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्वस्तिक पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणारा ठराव मांडावा अशी मागणी केली. मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्ग करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांची असली तरी तो लादला जाणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठचे भूमी संपादन रद्द झाले असल्याची माहिती दिली.

कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जिल्ह्यात ऊसपीक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा मुश्रीफ यांनी केली. आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक, शेतकरी सभासद उपस्थित होते.