कोल्हापूर : तीन दिवस जिल्ह्यासह धरण, पाणलोट क्षेत्रात पावसाने दिलेली उघडीप, कोयना-वारणा धरणांतून बंद करण्यात आलेला विसर्ग, राधानगरी धरणाचे बंद झालेले दरवाजे यामुळे कृष्णा-पंचगंगेची पाणीपातळी रात्रीपासून ओसरू लागली आहे. परिणामी करवीर, हातकणंगले, कागल, शिरोळ तालुक्यावरील पुराचे संकट टळले असून, जनजीवन पूर्ववत होऊ लागले आहे.
गेले दोन-तीन दिवस पावसाने सर्वत्र उघडीप दिली आहे. यामुळे धरणात पावसामुळे होणारी पाण्याची आवक बंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना व वारणा धरणातून विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आला. राधानगरी धरणाचेही सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. याचाच परिपाक म्हणजे करवीर, शिरोळ तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत शुक्रवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात घट होत गेली आहे. कृष्णा-पंचगंगेचा पूर ओसरू लागल्याने पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चार दिवसांपूर्वी नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने हजारो पूरग्रस्तांना कुटुंबातील आबालवृद्ध सदस्य व जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले होते. यामुळे त्यांना मोठा मानसिक त्रास सोसावा लागला होता. पुराचे पाणी ओसरू लागल्याने पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावरील चिंता दूर झाली आहे.
सायंकाळी नृसिंहवाडी येथे पाणी पातळी ६२ फूट ३ इंच होती. ती आज सकाळी आठ वाजता ६१ फूट ६ इंचांवर खाली आली आहे. राजापूर धरणाजवळ काल सायंकाळी ५१ फूट ४ इंच होती, ती आज सकाळी ५१ फुटांवर आली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने शिरोळ तालुक्यावर येऊ घातलेले महापुराचे संकट तूर्त तरी टळले आहे.