कोल्हापूर : सलग सुट्ट्या, श्रावण महिना आणि सोमवार मंगळवारपासून होणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया यामुळे आज रविवारी कोल्हापूर करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी लाखावर भाविकांनी गर्दी केली. रासायनिक संवर्धन प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार असल्याने भाविकांना गाभाऱ्यातील देवीचे दर्शन घेता येणार नाही पर्यायी दर्शन घ्यावे लागणार आहे.
गेल्या पंधरवड्यापासून कोल्हापुरात भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. त्याआधी राज्यभरात जोरदार पाऊस पडत होता. आठ दहा दिवस मुसळधार पावसाने राज्यभरात जनजीवन विस्कळीत झाल्याचे वृत्त होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर आता कोल्हापुरात महालक्ष्मी, दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे .
आज रविवारी देवीच्या दर्शनासाठी एक लाख तीन हजार भाविक आले होते. काल शनिवारी २६, १०५तर शुक्रवारी २१,०७४ भाविकांनी दर्शन घेतले, अशी माहिती व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी आज दिली.
श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन सोमवार ते मंगळवार पर्यंत भाविकांना घेता येणार नाही. या कालावधीमध्ये भाविकांना श्रीं ची उत्सवमूर्ती व श्रीकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरुन श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घ्यावे, असे देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांनी केले असल्याने उद्यापासून दोन दिवस थेट दर्शन मिळणार नसल्याने भाविकांनी आजच अधिक गर्दी केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
देवस्थान, किल्ले पन्हाळा येथेही भाविक, पर्यटकांची लगबग वाढली आहे. शहरातील रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस, कणेरी मठ, खिद्रापूर, जोतिबा आणि पन्हाळा येथेही वावर वाढला आहे. कोल्हापूरात पर्यटन, भाविकांची संख्या वाढली असल्याने वाहन तळे वाहनांनी भरून गेली आहेत. शहरात इतरत्र वाहनांची गर्दी दिसू लागली आहे. सलग सुट्ट्यांमुळे पुणे -बेंगलोर महामार्गावरील कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या किणी टोल नाका येथे आज वाहनांची रीघ लागली होती. टोल यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागली. सुट्टींमुळे कोल्हापुरला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. येथून अनेकांनी कर्नाटक, गोवा, कोकण येथे जाण्याचे नियोजन केलेले दिसते. परिणामी महामार्गावरील धाबे, हॉटेल पर्यटकांनी भरलेले आहेत.
प्रवासी संख्या वाढल्याने एसटी महामंडळाला चांगला फायदा होताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक, गडकोट, निसर्गसौंदर्य अशी पर्यटनाची अनेक स्थळे आहेत. सुट्टी असल्याने या पर्यटनस्थळी पर्यटकांचा राबता वाढला होता. महालक्ष्मी, जोतीबा, नृसिंहवाडी, रंकाळा, न्यू पॅलेस म्युझियम, टाऊन हॉल म्युझियम येथे अधिक गर्दी होती.