कोल्हापूर : भावाबहिणीच्या नात्याचा गोडवा जपणारी राखी पौर्णिमा तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या ८ ऑगस्टला होणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने कोल्हापुरातील बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. विविध राख्यांनी संपूर्ण बाजारपेठ फुलली असून, खरेदीसाठी लाडक्या बहिणींची गर्दी होत आहे.भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. आपल्या लाडक्या भावाला ट्रेंडी राख्या बांधण्याची प्रत्येक बहिणीची इच्छा असते. पारंपरिक राख्यांची अलीकडे फॅन्सी राख्यांनी जागा घेतली आहे.
अशा वेगळ्या, आकर्षक राख्यांच्या खरेदीसाठी शहरात बाजार गेट, राजारामपुरी, महाद्वार रोड इतर ठिकाणी गर्दी होत आहे. किरकोळ विक्रेत्यांनी राख्यांची विक्री स्टॉल सुरू केले आहेत. सोनेरी – चंदेरी आवरणाचे, ॐ, जय श्री राम, त्रिशूळ, डमरू या धार्मिक नक्षीच्या राखी लक्ष वेधून घेत आहेत.वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी एविल आय डिझाइन केलेल्या राख्या देखील बाजारात उपलब्ध आहेत. मुलांसाठी नेहमी प्रमाणे कार्टून राखीची मागणी वाढली आहे. याच बरोबर लाडक्या बहिणीसाठी किंवा भावासाठी खास भेटवस्तू खरेदी करा, अशा ऑफर विक्रेते देत आहेत.
धार्मिक महत्त्व
श्रावण पोर्णिमेस श्रावणी असे देखील म्हणले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरुवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे श्रावणी’ साजरी करणे होय. श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात.हा सण म्हणजे बहिण भावाचे अतूट नाते दाखवतो.
हिंदू पौराणिक कथेनुसार, महाभारतात, जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे, भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.