सोनतळीतील शाहूकालीन मोती तलावासह लगतच्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरणाचा विषय पावसाळी अधिवेशनामध्ये गाजला. जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याबाबत खरेदीदार विकसक पारस ओसवाल यांनी केलेल्या अपिलास उपविभागीय अधिकारी करवीर यांनी पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश २१ जुल रोजी पारीत केले आहेत. तर, गट नं.३५१ मधील झालेल्या उत्खननाबाबत चौकशी करण्यात आलेली असून परवानगी न घेता उत्खनन केल्यामुळे जमीन खरेदीदारास २० लाख ३८ हजार रुपये इतका दंड भरण्याचे आदेश करवीर तहसीलदार यांनी दिले आहेत, असे लेखी उत्तर पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिले.   लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनात सोनतळीला अत्यंत मोलाचे स्थान आहे. सोनतळीवरच शाहू महाराजांनी आपल्या रयतेच्या हिताचे शेकडो निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली. याच ठिकाणी छ. शाहू महाराजांच्या काळापासून तलाव आहे. रि.स.नंबर ३५१ वरील सुमारे ३४ एकर जमिनीपकी २० एकर क्षेत्रात मोती तलाव आहे. संस्थान काळापासून नागरिक आणि जमिनीची तहान भागविणारा हा तलाव आणि त्याच्या लगतचे क्षेत्र छत्रपती शहाजी महाराज यांच्या मालकीचे होते. छत्रपती शहाजी महाराजांनी तलाव आणि लगतची जमीन कसण्यासाठी दलित बांधवांच्या नावावर केली. परंतु तलाव आणि तलाव लगतची जमीन मालकीची असणाऱ्या लोकांकडून जमिनीची विक्री करून घेऊन ती आपल्या नावावर करण्याची प्रक्रिया महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरू केली. सोनतळीतील शाहूकालीन मोती तलावासह लगतच्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण करण्यात आले आहे. तसेच जलसाठा असणाऱ्या तलावातील उत्खनन करून तलावात मुरुमाचा भराव टाकण्यात आल्या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी संबंधित विकासकाची चौकशी करण्याचे आदेश जून,  मध्ये दिले. त्यानुसार शासनाने यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कोणती कारवाई केली, असा प्रश्न  क्षीरसागर यांनी उपस्थित केला. त्यावर मंत्र्यांनी उपरोक्त उत्तर दिले.