कोल्हापूर : बनावट चलनी नोटा बाजारात खपवणाऱ्या सात जणांच्या टोळक्याला कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले आहे. टोळीमध्ये पुणे, कोल्हापूर येथील संशयीतांचा समावेश आहे. यातील म्होरक्याचे कोल्हापुरातील राजकीय नेत्याची लागेबांधे असल्याने दुहेरी राजकीय दबावाची दबाव वाढल्याची चर्चा आहे.

याप्रकरणी रोहन तुळशीराम सूर्यवंशी गडमुडशिंगी, कुंदन प्रवीण पुजारी विचारे माळ, ऋषिकेश गणेश पास्ते गंगावेश ( तिघेही अटक), अजिंक्य युवराज चव्हाण कोल्हापूर, केतन जयवंत थोरात पिंपरी पुणे, रोहित तुषार मुळे कराड व आकाश राजेंद्र पाटील मूळ काले कराड सध्या पिंपरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हरीश जसनाईक खारघर मुंबई यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा भरण्यात आल्या होत्या. याबाबत बँकेच्या उपव्यवस्थापिका तृप्ती कांबोज कोल्हापूर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दापाश आज पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा >>>भाजप २१४ च्या वर जात नाही ही चंद्रकांत पाटील यांची भीती – सतेज पाटील

रोहन सूर्यवंशी याने कुंदन पुजारी व ऋषिकेश पास्ते यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले होते. त्याने त्या केतन थोरात यांच्याकडे देऊन त्याच्याकडून २५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन दोघांना परत केल्या होत्या. पैकी एक हजार रुपये स्वतःसाठी खर्च केले होते.

नोटांमुळे ओळख वाढली

त्यानंतर पुढे वरील सर्वांची एकमेकांशी बनावट नोटा खपवण्याच्या व्यवहारातून ओळख झाली. त्यांनी आत्तापर्यंत १० हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपवलेल्या आहेत. केतन थोरात यांच्या सांगण्यावरून रोहित मुळे याने बनावट नोटांची छपाई केली करून ती पुन्हा केतन याला परत केली होती, असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>हातकणंगलेत पुन्हा एकदा साखर कारखानदार – शेतकरी नेत्यात लढत

गतवर्षींची पुनरावृत्ती

गतवर्षी जानेवारी महिन्यात गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर सापळा लावला होता.  संशयित क्रेटा कार आडवून कारमधील चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजीत राजेंद्र पवार (रा.गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्विजय कृष्णात पाटील (जयभवानी तालमीसमोर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांची कारसह झडती घेतली. तसेच बनावट नोटा तयार करणारा संदीप बाळू कांबळे  आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा) याच्या घरात एकूण साडे चार रुपये किंमतीच्या ५०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा मिळून पकडल्या होत्या.

बनावट नोटा बनवण्याचं साहित्य, कार आणि मोबाईल फोन जप्त

पोलिसांच्या पथकाने त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्याचे संगणक, प्रिंटर आणि इतर साहित्यासह क्रेटा कार तसंच मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपींविरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता हे नवे प्रकरण पुढे आले आहे.