कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांचे प्रभावी समर्थक, कोल्हापूर महापालिकेतील कारभारी म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत शुक्रवारी भेट घेतली. लवकरच कोल्हापुरात शक्तिप्रदर्शन करून देशमुख यांच्यासह माजी नगरसेवकांचा मोठा गट शिंदे सेनेत दाखल होणार आहे. हा सतेज पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या महिन्याभरापासून शारंगधर देशमुख हे सेनेच्या वाट्यावर असण्याची चर्चा होती. त्याला विधानसभा निवडणुकीचा संदर्भ होता. विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. ती न मिळाल्यामुळे ते नाराज होते. त्यातून शिवसेनेच्या नेत्यासोबत त्यांचा संपर्क वाढला होता.

त्यातून आज शारंगधर देशमुख यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम तसेच देशमुख समर्थक अशपाक आजरेकर व अभिजीत खतकर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसला धक्का कितपत?

दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसमधील १० नव्हे तर ३५ माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची म्हटले होते. त्यामुळे आता देशमुख यांच्यासोबत किती काँग्रेसचे नगरसेवक हाती धनुष्यबाण घेतात, याकडे लक्ष लागले आहे.