कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची अनेक दुर्मीळ छायाचित्रे आणि माहिती असणारे सात खंडांचे ग्रंथ उपलब्ध झाले आहेत. या सातही खंडांच्या प्रति येथील सह्याद्री इतिहास संशोधन केंद्रात दाखल झाल्या असून, त्या जिज्ञासूंना पाहता येतील, असे बुधवारी सांगण्यात आले.
भावनगरचे भावसिंहजी महाराज हे शाहू महाराजांचे परममित्र, जिवाभावाचे स्नेही, सहाध्यायी होत. शाहूंनी त्यांचे कायम स्मरण व्हावे म्हणून कोल्हापुरातील जुना राजवाडा ते नवीन राजवाडा या राजमार्गाला भावसिंहजी रोड असे नाव दिले. भावसिंहजी यांनीही महुआ येथे बांधलेल्या राजवाड्यास शाहू पॅलेस असे नाव दिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे सुसंस्कृत व कलाप्रिय होते. ते अनेक कवींचे व गायकांचे आश्रयदाते असून ते बी. टी. या नावाने कवी म्हणून प्रसिद्ध होते.
या भावसिंहजी महाराजांनी आपल्या राजकोट येथील राजकुमार कॉलेजवर ‘फोर्टी इयर्स ऑफ द राजकुमार कॉलेज’ हा सात खंडात्मक ग्रंथ लिहिला. त्याचे प्रकाशन सन १९११ मध्ये झाले. छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक वडील छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांचे शिक्षण येथेच झाले होते. त्यांची अनेक दुर्मीळ छायाचित्रे या ग्रंथात दिली आहेत. सुमारे २० किलो वजनाचे, हार्ड बायडिंगचे, अत्यंत सुस्थितीतील, अत्यंत दुर्मिळ असे हे सहा ग्रंथसंग्रह आहेत.