कोल्हापूर : महायुती शासनामधील कलंकीत, भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सोमवारी येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांच्या झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू,फुले,आंबेडकरांचा महाराष्ट्र हा देशातील आदर्श आहे.  सध्या गलिच्छ राजकारण करून सत्तेसाठी वाट्टेल ते करायला निघालेल्या या शासनामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा मंत्र्यांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे. सत्तेसाठी हतबल असलेल्या नेतृत्वाने ही कारवाई न केल्याने या महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने येथील तावडे हॉटेल जवळ जोरदार निदर्शने केली. भ्रष्टाचारी कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.

उपनेते संजय पवार, सहसंपर्क विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, सुनील शिंत्रे, वैभव उगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये शिवसैनिक, महिला आघाडी पदाधिकारी, युवासैनिक व इतर अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जवळ झालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले तासाभरानंतर त्यांना सोडून देण्यात आले.