कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दळणवळणावर परिणाम होऊ लागला आहे. जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक लोखंडी कठडे लावून बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. तर , कोकणावरील वाहतुकीवरही याचा गंभीर परिणाम झाला असून आता तळ कोकण व गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्गे वाहतूक सुरू तळकोकण व गोवा या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या तीन मार्गांपैकी सध्या केवळ आंबोली घाटमार्गे वाहतूक सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी आज दुपारी एक च्या सुमारास दिली .

ओरोस अर्थात सिंधुदुर्गात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे भुईबावडा तसेच करूळ घाट होय . तथापि गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर दुसरा मार्ग म्हणजे राधानगरी तालुक्यातील फोंडा घाट. या मार्गावरील देवगड निपाणी रोडवरील फेजिवडे येथील कब्रस्तान जवळ पुराचे पाणी आल्याने तो ही मार्ग ,पर्यायाने घाट बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ आंबोली मार्गेच तळकोकण व गोव्याकडे जाता येईल याची संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दरड कोसळली

आज सकाळी अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने सदर मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. दुपार पर्यंत घाट वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे.

अनेक रस्ते बंद

गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर मांडूकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. दस्तुरी चौक (कळे) येथे बॅरिकेट्स लावून गगनबावड्याकडे जाणारी वाहने परत पाठवण्यात येत आहेत. कोल्हापूर – राजापूर हा राज्य मार्ग सुद्धा बाजारभोगाव या ठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद आहे. स्थानिक पोलीस यंत्रणा, वाहतूक विभाग व आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांनी गरज नसल्यास प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असे आवाहन कळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी केले आहे. निलेवाडी ता. हातकणंगले ते ऐतवडे ता. वाळवा यांना जोडणारा वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग चिकुर्डे पूल आहे. गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील नांगनूर बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी रस्ता संकेश्वर मार्गे आहे.