कोल्हापूर : कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी नळपाणी योजनेतील दोषांवरून राजकीय वाद वाढत चालला आहे. याबाबत सोमवारी प्रा. जयंत पाटील यांनी काळम्मावाडी नळपाणी योजना कुचकामी ठरल्याने सतेज पाटील यांना प्रश्न उपस्थित केले असताना ते नगरसेवकांना पुढे करून उत्तर देत आहेत. याऐवजी स्वतः आमदार सतेज पाटील यांनी आमच्याशी चर्चा करण्यास तयार व्हावे, असे आव्हान प्रा. जयंत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.

प्रा. पाटील यांनी म्हटले आहे, की दोन दिवसांपूर्वी मी व भाजपा-ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन काळम्मावाडी योजना कशी कुचकामी ठरत आहे, हे तांत्रिक माहितीसह स्पष्ट केले होते. योजनेचे कर्तेकरविते सतेज पाटील यांनी ऐन सणासुदीच्या काळात पाण्याविना अक्षरशः रडकुंडीला आलेल्या जनतेची माफी मागावी, या प्रकल्पामध्ये काही काळबेरे नाही हे मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे, असे आव्हान केले होते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण महापालिकेचे स्थायी समिती सभापती असताना, योजनेला मंजुरी मिळाली, तरी त्यात त्यांचा काहीही सहभाग नाही. त्यांच्या स्वभावानुसार कोणतीही चर्चा न होता प्रस्ताव मंजूर करावा लागल्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ होते. चव्हाण सभापती असताना या नळपाणी योजनेला चर्चा न करता केवळ ३ मिनिटांत मंजुरी देण्यात आली होती. तेव्हा स्थायी समितीच्या सदस्यांची घालमेल प्रत्यक्ष पाहिली आहे. पण, नेत्याच्या संरक्षणासाठी नगरसेवकांना दावणीला बांधणे योग्य नाही, अशी आमची भूमिका आहे.

बावड्यात चर्चेची तयारी

वास्तविक आमच्या मुद्द्यावर माझा वैयक्तिक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे असे सांगणाऱ्यांनी याचे उत्तर देणे अपेक्षित असताना ते नगरसेवकांनी आपल्यावर ओढवून घेऊ नये. त्यांना चर्चा करावयास महालक्ष्मी मंदिर लांब पडत असेल, तर कसबा बावड्यातील हनुमान मंदिरात चर्चेला आणि शपथ घेण्यासाठी यायला तयार आहोत, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांना दिले आहे.

मूळ मागणी कोणती?

कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी नळ पाणी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे सातत्याने तांत्रिक दोष उद्भवत असल्याने कोल्हापूरकरांना आठवडाभर तहानलेले राहावे लागत आहे. याला ही योजना राबवण्यासाठी अट्टाहास धरणारे आमदार सतेज पाटील या सर्व गोंधळाला कारणीभूत आहेत. त्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेत केली होती.