दयानंद लिपारे, कोल्हापूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय बैठक जमवून खेडुतांसमवेत जेवणाचा आस्वाद घेणारे, एसटी कामगारांसमवेत टपरीवर चहाचे घुटके रिचवत गप्पाष्टक जमवणारे, कार्यकर्त्यांच्या घरी साध्या जेवणाची गोडीने चव चाखणारे देशाचे संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांचा साधेपणा कोल्हापूरकरांनी अनुभवला आहे. तद्वत, उद्योजकांना उद्योग भवनाची गरज ओळखून केवळ एका दिवसात ते मंजूर करणारे आणि फॅब्रिकेशनचा उद्य्ोग सुरू करणाऱ्या धडपडणाऱ्या हातांना उभारी देणारे देशाचे उद्योगमंत्र्यांच्या कामाची धडाडीही याच जिल्ह्यने पाहिली आहे. फर्नाडिस यांच्या अशा अनेक आठवणींचा कल्लोळ आज अनेकांच्या मनात रुंजी घालत राहिला.

कोल्हापूर हा तसा पुरोगामी विचारांचा जिल्हा. एकेकाळी येथे शेकापचे वर्चस्व. याच जिल्हय़ात जनता दल, समाजवादी पक्षही रुजला. त्यामागे फर्नाडिस यांच्यासारख्या नेतृत्वाचे पाठबळ कारणीभूत ठरले. ते जनता दलाच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री तर अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाजप सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते. एकेकाळी रस्त्यावर जीवन व्यथित करणारे हे व्यक्तिमत्त्व मंत्रिपदी आरूढ झाल्यावरही जुना साधेपणा विसरले नव्हते. याच्या कैक आठवणी कोल्हापूर जिल्ह्यच्या आजही आठवणीत आहेत.

जॉर्ज फर्नाडिस उद्योगमंत्री असतानाची गोष्ट. ते कोल्हापूरहून इचलकरंजीला ‘फाय फाऊंडेशन’च्या कार्यक्रमासाठी चक्क जीपमधून निघाले. सोबत होते तेव्हाचे जनता दलाचे जिल्हाध्यक्ष शंकर धोंडी पाटील, चिटणीस शिवाजीराव परुळेकर. शिरोली फाटय़ाजवळ आल्यावर त्यांनी गाडी थांबवली. मागून येणाऱ्या पोलीस ताफ्यातील अधिकाऱ्याकडे वळून ‘मला बंदोबस्ताची गरज नाही. तुमच्या नेहमीच्या कामासाठी जा’ असे सांगून त्यांना परत पाठवले. इचलकरंजीत त्यांनी बसस्थानकाजवळ एसटी कामगारांसमवेत चहा पिता पिता गप्पांचा फड रंगवला, असे सुरेश शिपूरकर सांगतात.

एक दिवसात उद्योग भवन मंजूर

१९७८ मध्ये फर्नाडिस यांच्या हस्ते बाबा आमटे यांना फायचा राष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमातील एक आठवण आजही सांगितली जाते. वस्त्रनगरीतील उद्योजकांनी स्थानिक उद्योगाचा विस्तार कथन करून येथे जिल्हा उद्योग भवनाचे कार्यालय सुरू करण्याची मागणी केली. मंत्री फर्नाडिस यांनी तत्काळ ती मंजूर केली. दुसऱ्या दिवशी नवी दिल्लीत पोहोचल्यावर त्या निर्णयाचा शासन आदेशही निर्गमित करून त्यांनी कार्यक्षमतेची प्रचिती आणून दिली, असे डॉ. एस. पी. मर्दा यांनी सांगितले. फर्नाडिस यांना त्वचारोगाची व्याधी होती. त्यासाठी ते दोन वेळा डॉ. मर्दा यांच्याकडे उपचार घेण्यासाठी आले होते. मर्दा हे मुंबईत वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना फर्नाडिस यांच्या कार्यालयात काम करत असत, तेव्हा त्यांनी लोकांशी हस्तलिखितपत्रे पाठवून संपर्क ठेवत, असेही मर्दा यांनी नमूद केले.

भावणारा साधेपणा

फर्नाडिस यांचे मुंबईत एक सहकारी होते, जगदीश देशपांडे. त्यांनी आजरा तालुक्यातील गावी पत्नी, चित्रकार अरुणा देशपांडे यांच्यासमवेत अंगणवाडीची इमारत बांधली. त्याचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी तेथे भारतीय बैठक जमवून भोजनाचा आस्वाद घेतला. तर, कोल्हापुरात माकडवाला वसाहतीत व्यंकाप्पा भोसले या कार्यकर्त्यांच्या घरी साधे जेवण आवडीने घेतले. तेथील काही जण बॉयलरच्या फॅब्रिकेशनचे काम करत असल्याबद्दल त्यांच्या कौशल्याचे कौतुक करून एसटी कामगारांच्या बँकेतून अर्थसाहाय्य देण्याची तयारी दर्शवली. कोल्हापुरात एसटी कामगाराच्या आंदोलनाच्या निमित्ताने ते दोनदा आले होते. सह्यद्री हॉटेलच्या ‘१०६’ क्रमांकाच्या खोलीतील मुक्काम संपवून ते लढा यशस्वी करून परत निघाले तेव्हा त्यांनी लाल डब्यातून जाण्याचा निर्णय घेतल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता, असे शिवाजीराव परुळेकर सांगतात.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapurkar remember memories of the george fernandes simplicity
First published on: 30-01-2019 at 02:20 IST