कोल्हापूर : पौराणिक, ऐतिहासिक वारसा असलेल्या कोल्हापुरात हत्तीचे वैभव हे परंपरेला जणू साजेसेच. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर, छत्रपतींचा जुना राजवाडा, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नांदणी जैन मठ अशा ठिकाणी हत्ती पालनाची परंपरा आहे. आता केवळ रामलिंग डोंगराजवळ ( ता. हातकणंगले) असलेल्या कुंथुगिरी जैन तीर्थक्षेत्री हत्ती उरला आहे.

स्वराज्याची दुसरी गादी असलेल्या कोल्हापूर संस्थानात छत्रपतींच्या बरोबरीने रयतेलाही हत्तींचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. ऐतिहासिक दसरा मिरवणूक, देवीची नगरप्रदक्षिणा, पालखी, साठमारीचा खेळ हत्ती या बुद्धिमान प्राण्याविषयी इथल्या जनतेत कोण जिव्हाळा. जुन्या राजवाड्याजवळ नगारखान्याच्या कमानीत यशवंत व मोती हे झुलत असायचे. लुगडी ओळ येथे तर हत्तीमहाल होता. खेरीज, सोनतळी छावणी, फेजिवडे हत्तीमहाल, नवा राजवाडा येथे सुधा संस्थानचे हत्ती झुलत असायचे. साठमारीच्या खेळात विशेष कौशल्य पणाला लावणारा बर्ची बहाद्दर हत्ती हा तर अवघ्या कोल्हापूरकरांच्या गळ्यातील ताईत. दसऱ्याच्या दिवशी अलंकार मंडीत हा गजराज दृष्ठ काढावा इतका देखणा, रुबाबदार दिसायचा. बर्चीबहाद्दरसाठी खाऊ घेऊन बाळगोपाळ आवर्जून येत असत.

बर्चीबहाद्दरचा करुण अंत जून १९७० मध्ये बर्चीबहाद्दरला वेगळ्याच संकटाला तोंड द्यावे लागले. रिकामटेकड्या लोकांनी हुर्यो केल्याने फिरायला गेलेला बर्चीबहाद्दर बावचळला. बर्चीबहाद्दर पिसाळला असा गलका करीत लोकं सैरावैरा पळू लागल्याने तो आणखीच बिथरला. चुचकारून त्याला जुन्या राजवाड्याकडे वळवले. पण सायंकाळी ट्रक, रोडरोलर ढकलून बर्चीबहाद्दर पुन्हा शहरभर फिरू लागला. प्रयत्नांची शर्थ करून त्याला जेरबंद करण्यात आले. रात्री कोल्हापुरात जमावबंदी लागू करण्यात आली. पायाला चिमटे लावल्याने त्याच्या पायांना जखम झाली. ती चिघळत गेली. सव्वा महिन्यात त्याने अखेरचा श्वास घेतला.

गजलक्ष्मीची लोकप्रियता बर्चीबहाद्दर गेल्यानंतर अनेकांच्या पुढाकारातून २६ जानेवारी १९८४ रोजी गजलक्ष्मी हि हत्तीनं आणली गेली. तिने प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या संचलनात भाग घेतला. तिची लोकप्रियता वाढत गेली. पुढे , ५- ६ वर्षानंतर ती आजारी पडली .उपचार केले पण प्रतिसाद मिळाला नाही. थोड्याच अवधीत तिने डोळे मिटले. जोतिबाचे सुंदर वैभव जोतिबा देवस्थानाकडे पूर्वी ६ हत्ती आणि १२ घोडे असल्याची नोंद सापडते. पुढे वारणा उद्योग समूहाचे नेते आमदार विनय कोरे यांनी बिहार राज्यातून १४ लाख रुपये किमतीचा ९ वर्षाचा सुंदर हत्ती जोतिबा चरणी अर्पण केला.हत्तीची निगा राखणं देवस्थानला जमेनासे झाल्याने त्याला वारणानगरला ठेवण्यात आले.

जोतिबा डोंगरावर असताना साखळदंडाने बांधल्यामुळे सुंदरच्या पायाला जखमा झालेल्या होत्या. प्राणी मित्र संघटनांनी तक्रार केल्यावर ब्रिटीश संगीतकार पॉल मॅककार्टनी पासून ते अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी आवाज उठवल्यावर प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजू लागले. उच्च न्यायालयाने जून २०१४ मध्ये सुंदरला बंगरुळूच्या हत्ती पुनर्वसन केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले. मोठ्या शिकस्ती नंतर सुंदरची रवानगी कर्नाटकातल्या बाणेरगठ्ठा बगिच्यात करण्यात आली खरी पण काही काळातच त्याचे निधन झाले. आमदार विनय कोरे यांनी राज्य शासनाकडे तक्रार केली.

महादेवीसाठी जनआंदोलन आता नांदणी जैन मठातील महादेवी तथा माधुरी हत्तीचे प्रकरण गाजत आहे. येथेही पेटा प्राणीमित्र संघटनेने तिची हेळसांड होत असल्याची तक्रार केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिला गुजरात मधील वनतारा पशु संग्रहालयात पाठवण्यात आले आहे. पाठोपाठ त्याची मालकी असलेल्या उद्योगपती अंबानी यांच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या जात असून त्यांच्या जिओ सीमवर बहिष्कारचे मोहीम राबवली जात आहे. तर जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी महादेवी परत आणण्यासाठी गल्ली पासून दिल्ली पर्यंत आवाज उठवला आहे. याची दाखल घेऊन वनताराचे एक पथक शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु झाली आहे. प्रश्न इतकाच कि महादेवी परत येणार कि लोकप्रतिनिधी, जैन महास्वामी, भाविक, सामान्य जनता याचे प्रयत्न व्यर्थ ठरणार हाच काय तो.