कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना, पर्यावरणाला उद्ध्वस्त करणारा असल्याने शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. तो दर्शवण्यासाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय येथे झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मुकुंद देसाई होते.
सुरवातीला संघर्ष समितीचे निमंत्रक आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई बैठकीमागील हेतू सांगताना म्हणाले की १२ जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठच्या विरोधात लढत आहेत. हा मार्ग शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा आहे. त्यातच भर म्हणून चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी नव्या मार्गाची मागणी करून शेतकऱ्यांच्या जमिनी आणि इथल्या निसर्गाची नासाडी करण्याच्या शासनाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळं आजची बैठक की आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आहे. लढ्याचे नियोजन करण्यासाठी आहे.
शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यांनवर म्हणाले की, हा रस्ता जरी देवाचे नाव घेऊन होत असला तरी तो केवळ अदानीसाठी होत आहे. बड्या उद्योजकाची खनिजे गडचिरोलीहुन गोवा मार्गे परदेशात पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना बळी दिले जात आहे. त्यामुळं आमचा या महामार्गाला विरोध आहे.
बळीराजा संघटनेचे नितीन पाटील म्हणाले की, हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत होऊ नये यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे ते आपण सगळे मिळून करू. त्यासाठी गाववार बैठकांचे आयोजन करावे लागेल.
शिवसेनेचे युवराज पोवार म्हणाले की लोकांना सत्ताधारी आमदार निधी मिळणार नाही अशी धमकी देत आहे, लोकांना आपण शक्तीपीठचा धोका समजावून सांगितला पाहिजे.
अध्यक्षीय समारोपात मुकुंद देसाई म्हणाले की, आजरा तालुक्यात अनेक प्रकल्प झाले त्यातील विस्थापितांचे अजून पुनर्वसन झालेले नाही, असे असताना हा महामार्ग शेतकऱ्यांच्या डोक्यावर का मारला जात आहे. या महामार्गाला पूर्ण शक्तीनिशी विरोध करूया.
यावेळी तानाजी देसाई, उमेश आपटे, दशरथ घुरे, शांताराम पाटील, नागेश चौगुले, बाळू पाटील, गोविंद पाटील, शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे यांनी मनोगते व्यक्त केली. सुरवातीला अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
विद्याधर गुरबे, अल्बर्ट डिसोझा, रवी भाटले, रामदास पाटील, संजय तरडेकर, प्रकाश शेटगे, किरण पाटील, नारायण भडांगे, संभाजी सांबरेकर, विष्णू पाटील यांच्यासह दाभिल, शेळप, घाटकरवाडी, पारपोली, जेऊर, चितळे, भावेवाडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.