आम्ही नाकारलेले उमेदवार तिकडे गेले आहेत. असे उमेदवार घेऊन लढण्याची वेळ राज्यात भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांवर आली आहे. अशांचा पराभव करणे अवघड नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामकाज पद्धतीवर टीका केली. उभय काँग्रेसमधून सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा संदर्भ घेऊन ते म्हणाले, ‘साम, दाम, दंड, भेद नीतीचा मार्ग अवलंबून आणि विरोधकांतील कमजोरी, उणिवा हेरून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप-शिवसेनेने सुरु केला आहे. लोकशाही तत्वाला हरताळ फासण्याचा उद्योग त्यांनी आरंभला आहे. पाच वर्षे सत्तेत राहूनही लोकांच्या मनात घर करता येत नसल्याने दुसऱ्याच्या पक्षातील लोकांना घेऊन निवडणुका लढवाव्या लागत आहेत. येथेच निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने जाणार हे स्पष्ट होत आहे.

भाजप-शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी कोल्हापुरात होत असताना अडीच लाख खुर्च्या आणि पाच लाखांची उपस्थिती असेल असे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर जयंत पाटील यांनी ‘अडीच लाख खुर्च्या कोल्हापुरात आहेत तरी का’? अशी विचारणा करून ‘सभेचे मैदान अडीच लाख लोकांना सामावून घेण्याच्या क्षमतेचे नसल्याने तेथे अडीच लाख माणसे कुठून गोळा करणार,’ अशी खिल्ली त्यांनी उडवली. खोटे बोलायचे, पण रेटून बोलायचे; भपका निर्माण करायचा ही भाजपाची काम करण्याची पद्धत असल्याची टीका त्यांनी केली.

प्रदेशाध्यक्षांनी सावरले प्रदेशाध्यक्षांना

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे एका ध्वनिफितीमुळे अडचणीत आले आहेत. या प्रकाराकडे जयंत पाटील यांचे लक्ष वेधले असता पाटील यांनी ‘कार्यकर्त्याशी संवाद साधत असताना वैयक्तिक स्वरूपाचे ते संभाषण होते. त्यामुळे त्याला अधिक महत्व देण्याची गरज नाही’, असे म्हणत प्रदेशाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना सावरले.

सतेज पाटील यांनी दुरुस्त व्हावे

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला समर्थन दिल्याने कोल्हापुरात आघाडी धर्माला धक्का बसला आहे. याबाबत समनव्यक ठेवण्यासाठी जयंत पाटील कोल्हापुरात आले होते. याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘सतेज पाटील यांना काँग्रेस पक्ष अपेक्षित सूचना करेल. अद्याप वेळ गेलेली नाही त्यामुळे आमदार सतेज पाटील यांनी दुरुस्त व्हावे. त्यांना भविष्यकाळ उज्वल आहे. त्यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली नाही तर त्यांना काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तरीही सतेज पाटील हे ऐकत नसतील तर त्यांच्याशिवाय आम्ही निवडणुकीला सामोरे जावू’.