कोल्हापूर : जनावरांच्या लंपी चर्मरोगाची लागण लगतच्या जिल्ह्यात झाल्याचे वृत्त आहे. ही साथ कोल्हापूर जिल्ह्यात येऊ देऊ नका. यापूर्वी लंपी रोगप्रतिबंधक लसीकरण चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात राबवल्यामुळेच नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे, असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत दूध उत्पादन वाढीसाठी व स्वच्छ दूध निर्मिती प्रोत्साहनासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उत्कृष्ट पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा शुभारंभ व आदर्श गोठा पुरस्कार चा वितरण सोहळा येथील राजर्षी शाहू सभागृहात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. महेश शेजाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, सहायक आयुक्त डॉ. सॅम लुद्रीक, कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे आदी उपस्थित होते. सर्व तालुक्यातील पुरस्कार प्राप्त बारा पशुपालकांना पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पुरस्काराच्या रुपाने देण्यात आले.
आबिटकर म्हणाले, जिल्ह्यातील अर्थकारणाचा महत्त्वाचा उद्योग दुग्ध व्यवसाय असून दुग्ध उत्पादन करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत असून हे उत्पादन स्वच्छ व दर्जेदार पद्धतीने होण्यासाठी आदर्श गोठा तयार होणे आवश्यक आहे. आदर्श गोठा पुरस्कारार्थींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील पशु पालकांनी आदर्श गोठे तयार करावेत व राज्यात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन करुन आदर्श गोठा अभियानाच्या धर्तीवर आता जिल्हा परिषदेच्या वतीने ‘स्वच्छ सुंदर घर अभियान राबवण्यात येणार असून या अभियानातही जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. लंपी रोगप्रतिबंधक लसीकरण चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात राबवल्यामुळेच या रोगावर नियंत्रण ठेवण्यात यश आले असून जळीतग्रस्त जनावरांना अनुदान राज्यात केवळ कोल्हापूर जिल्ह्यात दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वच्छ व सुंदर गोठा अभियानंतर्गत रोख पारितोषिकाची तरतूद करणारी केवळ कोल्हापूर जिल्हा परिषद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानामुळे प्रेरणा घेऊन युवकांना दुग्ध व्यवसायाबद्दल प्रोत्साहन मिळावे व गोठ्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वच्छ व दर्जेदार दूध निर्मिती व्हावी. तसेच मानव आणि पशुधनाच्या आरोग्याबरोबरच गोठ्याची फवारणी व स्वच्छतेमुळे पर्यावरणाचा समतोल साधला जाईल, असे त्यांनी सांगितले.