शनिशिंगणापूरनंतर करवीर नगरीतील महालक्ष्मी मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिल्याने या वादावर तोडगा काढण्यासाठी  रविवारी पोलिस ठाण्यात बठक घेण्यात आली. यामध्ये गाभाऱ्यात प्रवेश देण्याबाबत पुजाऱ्यांनीही सकारात्मक निर्णय जाहीर केला असून सोमवारी सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन गाभाऱ्यात प्रवेश करण्याबाबत निर्णय घेणार आहेत.
महालक्ष्मी मंदिरातील गाभारा प्रवेशाचा वाद रंगू लागला आहे. शनििशगणापूर येथील आंदोलनाला यश आल्याने तृप्ती देसाई यांनी आता ‘चलो कोल्हापूर’चा नारा दिला आहे. न्यायालयाने महिलांना मंदिर प्रवेशाचा हक्क दिल्याने कोणत्याही परिस्थितीत गाभाऱ्यात जाणारच, असा निर्धार  देसाई असून त्या संदर्भातले पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
या पत्राद्वारे गाभारा प्रवेशाचा वाद मिटवा अन्यथा १३ एप्रिलला आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  त्यावर स्थानिक सामाजिक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. यामध्ये बाहेरच्या महिला आणि स्थानिक महिला असा नवा वाद सुरू आहे. बाहेरून महिला येऊन आंदोलन करण्यापेक्षा कोल्हापुरातील महिलांना गाभारा प्रवेश देऊन सामाजिक समतेचा संदेश देण्याची मागणी सामाजिक संघटना आणि महिलांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत रविवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बठक होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. या वेळी मंदिरातील पुजाऱ्यांनीही महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. देवीच्या अंगावरील प्राचीन पुरातन किमती दागिने, मूर्तीवर झालेली संवर्धनाची प्रक्रिया, गाभाऱ्यामध्ये असलेली अपुरी जागा आणि आतील आद्र्रतेचे प्रमाण याचा विचार करून गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात येत होता. मात्र प्रतीकात्मक प्रवेशाला काही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज समन्वय झाला असला तरी गाभाऱ्यात कोण प्रवेश करणार, याबाबत श्रेयावाद रंगण्याची चिन्हे आहेत.