सर्वच संघटना आंदोलनाच्या तयारीत

उत्तर प्रदेशने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातही आता या दिशेने पावले पडू लागली आहेत. हा मुद्दा आधीच उचलून धरलेल्या राज्यातील शेतकरी संघटनांनी आता आक्रमक आंदोलन हाती घेतले आहे. खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, डाव्यांची किसान सभा अशा बहुतेक सर्वच संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करण्याचे ठरवले असून त्याचा तपशीलही त्यांनी जाहीर केला आहे. यामुळे रणरणत्या उन्हात राज्यात शेतकऱ्यांचा एल्गार चांगलाच तापणार असल्याचे दिसू लागले आहे.

राज्यातील शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटांनी बेजार झाला आहे. सलग दोन वष्रे पडलेला दुष्काळ आणि यंदा विपुल शेती उत्पादन होऊनही कोसळलेले दर यामुळे बळीराजाचे आíथक कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांची ही दुरवस्था लक्षात घेऊन राज्यातील विरोधकांनी आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी नुकतीच विदर्भ-मराठवाडय़ात संघर्ष यात्रा काढून आंदोलन तापवले होते. उत्तर प्रदेश शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना १ लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सभागृहात उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्य शासन कृषी माफी करणार असल्याचे सूतोवाच केले. यामुळे कृषी कर्जमाफी नजरेच्या आवाक्यात येऊ लागल्याचे दिसत असल्याने या मुद्यावर अगोदरच रान उठवणाऱ्या राज्यातील शेतकरी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे.

केंद्र व राज्याच्या सत्तेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त निवडत राज्यभर ऋणमुक्ती अभियान राबवण्याचे ठरवले आहे. याबाबत संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले, की या मुद्यावर संघटनेने अगोदरपासूनच आंदोलन छेडले आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांची थकबाकी किती आहे, ती कशामुळे झाली आहे याची माहिती संकलित केली आहे. २८ एप्रिल रोजी राज्यात युवा आघाडीच्या वतीने जनजागृती रॅली काढून या बाबतचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. याची सांगता ४ मे रोजी कोल्हापूर येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेनेही कर्जमुक्तीसाठी शेतकरी आसूड यात्रा ११ एप्रिलपासून काढणार असल्याचे घोषित केले आहे. उपराजधानी नागपूर येथे २१ एप्रिल रोजी सुरू होणारी आसूड यात्रा ४ किलोमीटरचा प्रवास करून वडनगर (गुजरात) येथे पोहोचणार आहे. संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतीमालाला उत्पादित खर्चावर ५० टक्के नफा मिळावा, निर्यातबंदी हटवावी या मागण्यांसाठी ही संघटना आंदोलन करणार आहे.

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा शब्दप्रयोग देशात प्रथमच वापरणाऱ्या शरद जोशी यांच्या संघटनेनेही या विषयाला धरून अगोदरच आंदोलनाला सुरुवात केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. येत्या गांधी जयंतीला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी हे गाऱ्हाणे घालत गांधींच्या साबरमती आश्रमासमोर आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी सांगितले.

डाव्या आघाडीनेही शेतकऱ्यांचा हा ज्वलंत प्रश्न उचलून धरण्याचे ठरवले आहे. किसान सभेची २७ मार्च रोजी राज्यस्तरीय बठक होऊन आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. ११ एप्रिल या महात्मा फुले जयंती व छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिनापासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आसूड यात्रा काढण्यात येणार आहे. तर ११ मे रोजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे कर्जमुक्ती परिषद घेण्यात येणार असून, याच दिवशी फुंडकर यांच्या घरावर आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याचे किसान सभेचे नेते प्रा. उदय नारकर यांनी सांगितले.