कोल्हापूर : राज्यातील सहकारातील सर्वात मोठ्या ‘गोकुळ’ दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी महायुतीच्या हालचाली सुरू झाल्याचे गुरुवारी थेट अध्यक्षांनीच जाहीर केले असताना दुसरीकडे सत्तारूढ शाहू आघाडीने आपला वरचष्मा कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ) मध्ये आमदार सतेज पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. सध्या गोकुळच्या अध्यक्षपदी मुश्रीफ समर्थक अरुण डोंगळे आहेत. त्यांची अध्यक्षपदाची दोन वर्षाची मुदत संपल्याने आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा देणार होते.

महायुतीची हालचाली गतिमान

आज पत्रकारांशी बोलताना डोंगळे म्हणाले, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महायुतीचा अध्यक्ष करायचा असल्याने पदाचा राजीनामा देऊ नये असे सुचवले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी माजी मंत्र्यांनी शक्कल लढवीत माजी मुख्यमंत्रीची मदत घेऊन महाविकास आघाडीची सत्ता बनवली. आता महायुतीचा अध्यक्ष होण्यासाठी अदृश्य शक्ती कार्यरत असल्याचे सांगितले. गोकुळ मध्ये महायुतीची सत्ता येण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी युतीधर्म पाळावा, असे आवाहन भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे.

शाहू विकास आघाडी एकसंघ

आज गोकुळच्या मासिक बैठकीसाठी डोंगळे यांनी रजाचिट्टी पाठवली होती. तीन संचालक अनुपस्थित होते. उर्वरित संचालकांच्या उपस्थितीत बैठक झाली. उपस्थितांची आकडेमोड करीत गोकुळ मध्ये सत्तारूढ शाहू विकास आघाडी एकसंघ असल्याचा दावा करण्यात आला.

पाटील-मुश्रीफ एकत्रच

गोकुळच्या निवडणुकीवेळी युती- आघाडी असे काही नव्हते तर गट होते. त्यात तूर्त बदल नाही, असे नमूद करून हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यायच्यावेळीच युतीधर्म कसा आठवला. खुर्ची सोडवत नसल्याने हे प्रकार सुरु आहेत, असा टोमणा लगावला.

डोंगळेचा राजीनामा?

तर, शाहू आघाडीच्या सत्तेत काही बदल होणार नाही, असा निर्वाळा देऊन सतेज पाटील यांनी डोंगळे दोन दिवसात राजीनामा देतील, असा दावा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोकुळचे राजकारण

कोल्हापूर जिल्हाच्या राजकारणाची आर्थिक नाडी असलेली संस्था म्हणजे गोकुळ. या संस्थेवर २५ वर्षे महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, अरुण नरके यांची सत्ता होती.चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत गोकुळ मधील महाडिकांच्या विरोधात असलेल्या नेत्यांना आपल्या सोबत घेऊन सत्ता उलथवून लावली. यानंतर गोकुळचे अध्यक्ष पद दोन-दोन-एक असे वर्ष वाटून घेण्याचा निर्णय पाटील-मुश्रीफ यांच्यात झाला. सुरुवातीला काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या गटातील विश्वास पाटील यांनीदोन वर्ष अध्यक्षपद भूषवले. यानंतर दोन वर्ष हसन मुश्रीफ गटाचे अरुण डोंगळे अध्यक्षपद भूषवले. त्यांचा कार्यकाल आज संपला असून त्यांना राजीनामा देण्यास दोन्ही नेत्यांनी सांगितले होते. मात्र तेच नेते आता या दोघांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.