मराठा समाजाच्या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर कोल्हापुरात उद्या शुक्रवारी मराठा-दलित ऐक्य परिषद आयोजित केली आहे. या परिषदेला एक लाखाहून अधिक लोक उपस्थित राहतील असा संयोजकांचा दावा आहे. परिषदेला सर्वपक्षीय प्रमुखांची उपस्थिती आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात विविध जातिसमुदायांमध्ये सलोखा कमी होऊन जातीजातींत दरी निर्माण झाली आहे. ती कमी करण्यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे. ताराबाई पार्क येथील सासने मदान येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजता ही परिषद घेण्यात येणार आहे. परिषदेचा हेतू विशद करताना आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले, की महाराष्ट्राच्या समाजजीवनात मराठा, दलित, ओबीसी, आदिवासी तसेच इतर जातिधर्मातील लोकांनी एकदिलाने राहावे, जातीजातींत निर्माण झालेली दरी कमी होऊन सलोखा निर्माण व्हावा, यासाठी ही परिषद घेण्यात येत आहे.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आहेत. परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आहे. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार , आमदार,  मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष  विठ्ठल पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य अच्युत माने, डॉ. कृष्णा किरवले आदी मार्गदर्शन करणार आहेत.