संयोजक आणि प्रशासनाची जय्यत तयारी

राज्यात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चा अंतर्गत शनिवारी करवीरनगरीत मोर्चा निघणार आहे. मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वसंध्येलाच काही लक्ष लोक बाहेरून शहरात दाखल झाले असून त्यात सीमा भागातील मराठी भाषकांचा समावेश आहे. मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळणार हे गृहीत धरून संयोजक व प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. शहराच्या चार प्रमुख ठिकाणांपासून मोर्चाला सुरुवात होणार असून हे त्याचे वैशिष्टय़ असणार आहे.

शनिवारी सकाळी ११ वाजता एकाच वेळी चार ठिकाणांहून मोर्चास प्रारंभ होणार आहे. शाळा, महाविद्यालयांसह उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने उद्या कोल्हापूर अघोषित बंद राहणार आहे. शहराच्या ९ प्रवेश केंद्रांतून वाहने आतमध्ये येतील. शेडापार्क, तपोवनसह, कृषी महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठासह विविध ३८ ठिकाणी वाहन तळाची व्यवस्था केली आहे.

नियोजन असे आहे

गांधी मदान, सायबर चौक, संभाजी महाराजपुतळा, रुईकर कॉलनी, भगवान चौक बावडा येथून मोर्चास एकाच वेळी सुरुवात होईल. प्रत्येक ठिकाणी पाच मुली मशाल हाती घेऊन पुढे जातील. त्यांच्या मागे महिला, मुली, तरुण कार्यकत्रे, ज्येष्ठ नागरिक आणि आणि शेवटी राजकीय नेत्यांचा समावेश असेल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मोर्चात सहभागी होण्याविषयी कुतूहल आहे. दसरा चौकात दुपारी एकच्या सुमारास एकाचवेळी मोच्रे एकत्रित येणार आहेत.

टॉवर, स्वच्छतागृहे, एलईडीची सोय

मोर्चासाठी १४ एलईडी स्क्रीन, ९ ड्रोन कॅमेरे, पाचशे जणांचे वैद्यकीय पथक तनात करण्यात आले आहे. कुणालाही त्रास झाल्यास तातडीने वैद्यकीय सेवा पुरविली जाईल. ३२ टॉवरच्या माध्यमातून मोर्चावर नजर ठेवण्यात येईल. मोर्चाच्या मार्गावर सातशे स्वच्छतागृह असतील. महापालिकेने चारशे मोबाईल टॉयलेट दिले आहेत. यानिमित्ताने शहरातील १७ पुतळ्यांची फुलांनी सजावट करण्याचा निर्णय घेतला आहे.  महापालिकेतर्फे पुतळ्यांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पाणी, नाश्ता, जेवण, फळे वाटप केंद्रे उभारण्यात आली आहेत. या  वाटपाचा उद्देश सेवा व सोय हा आहे. तथापि मोर्चातील सहभागी लोकांनी विनाकारण अशा वाटप केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ठळक वैशिष्टय़े

  • तीन लाख वाहनांसाठी वाहनतळ
  • शहरात आज वाहनांना बंदी
  • सर्व उद्योग, व्यापार, शाळा महाविद्यालये बंद
  • हॉटेल, मंगल कार्यालये सुरू राहणार