कोल्हापूर: लाडकी बहीण योजनेसाठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणले पाहिजेत का? त्यांनी हे पैसे घरी नेले नाहीत. याबाबतची वस्तुस्थिती समजून घेऊन संजय शिरसाट यांनी विधान करायला हवे, असा प्रति टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ यांनी येथे लगावला.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी विभागाचा निधी वळवल्याबद्दल वित्त तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख न करता टीका केली होती. या संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, शासनातील संबंधित खात्यांचा निधी त्या योजनांसाठी देण्याची पूर्वीपासून पद्धत आहे. आता मागासवर्गीय, आदिवासी विभागाचा निधी त्याच विभागासाठी दिला यात काहीही गैर नाही. याबाबत संजय शिरसाठ यांना काही वावगे वाटले असते तर त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. त्यातूनही समाधान झाले नसले तर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधता आला असता. पण तसे न करता अजित पवार सारख्या सत्तेतीलच एका ज्येष्ठ नेत्यांवर चुकीची उपमा देणे योग्य आहे.

अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी आभाळातून पैसे आणा हवे होते का? त्यांनी या योजनेचे पैसे घरी नेले नाहीत. खरे तर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना जाहीर केली होती. योजना राबवण्याची जबाबदारी महायुतीतील सर्वांची आहे. इतकी मोठी योजना राबवताना दर महिन्याला ओढाताण होत आहे. एप्रिल महिन्याचे पैसे मे महिन्यात द्यावे लागले आहेत. आश्वासन पूर्ण करण्यासाठी सांघिक प्रयत्न हवे असताना कोणीही टीका करणे योग्य नाही, याची जाणीव मुश्रीफ यांनी करून दिली.

काँग्रेस पक्ष खाली करण्याची वेळ आली आहे असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले, त्यांनी नेमके काय म्हटले हे मला माहित नाही. तथापि राज्यात महायुतीकडे २३७ इतके भक्कम आमदारांचे पाठबळ आहे. विरोधकांकडे आमदारांची संख्या खूप कमी आहे. त्यांच्या आमदारांना विकासाची कामे पूर्ण होणार नाहीत, लोकांना दिलेली आश्वासने तडीस जाणार नाहीत असे वाटत आहे. यातूनच महायुतीमध्ये येण्याची स्पर्धा सुरू झालेली दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचे विधान केले होते. त्यावर मुश्रीफ म्हणाले, त्यांचे ते विधान एका जिल्ह्यापुरते होते असा खुलासा त्यांनीच केला आहे. परंतु महायुतीचे भक्कम पाठबळ असताना लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी लक्ष देणे केंद्रित करणे आवश्यक आहे. अशी विधाने टाळली पाहिजेत.