कोल्हापूर : अलमट्टी धरणासंदर्भात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या चार राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी गुरुवारी दिली. दिल्ली येथे या विषयाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने यांची उपस्थिती होती. त्यांनी मंत्री पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अलमट्टी धरणाबाबत केंद्रीय जल आयोगाने विहित केलेल्या हंगामी पाणी पातळी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून पावसाळ्यात पाण्याची पातळी कमाल मर्यादा ५१५ मीटर निश्चित करावी. बैठकीस खासदार शोभा बच्छाव, स्मिता वाघ, भाऊसाहेब वाकचौरे, पप्पू यादव आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचा पूर्ण विरोध – महाडिक

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातला आहे. त्याला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध आहे, असे निवेदन खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेत नवी दिल्लीत दिले.