कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण मुक्त करूनच इचलकरंजीला पाणी द्यावे. कृष्णा नदी योजनेची गळती काढून पाणी घेण्याचा पर्याय आहेच, इचलकरंजीकराना दूधगंगा नदीपात्रातून सुळकुड योजनेद्वारे पाणी दिले जाणार नाही. यासाठी आपला कायम विरोध राहील, असा इशारा माजी मंत्री, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शुक्रवारी दिला.इचलकरंजीच्या राज्यकर्त्यांनी पाण्यासाठी इतर नेत्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये भांडण लावू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

दत्तवाड ता. शिरोळ येथे दूधगंगा कृती समितीमार्फत झालेल्या लाक्षणिक उपोषण व गाव बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गांधी चौक येथे बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तवाड चे सरपंच चंद्रकांत कांबळे होते. इचलकरंजी सुळकुड पाणी योजना रद्द करावी या मागणीसाठी दत्तवाड, घोसरवाड ,टाकळीवडी, नवे दानवाड ,जुने दानवाड, येथील सर्व व्यवहार बंद करून ग्रामस्थांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. पाच गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दत्तवाड येथील गांधी चौक येथे लाक्षणिक उपोषण केले.

इचलकरंजीला नवीन नळपाणी योजनेची खरेच गरज आहे का? कि राजकारणासाठी सुळकूड पाणी योजना राबवली जात आहे, हे तेथील राजकर्त्यांनी स्पष्ट करावे,असा उल्लेख करून आमदार पाटील म्हणाले, पाण्यासाठी राजकारण करू नये शुद्ध पाणी हा सर्वांचा अधिकार आहे. पण पंचगंगा प्रदूषित करून शिरोळ तालुक्यातील टाकवडे पासून सर्व गावांना दूषित पाणी दिले आहे याचीही इचलकरंजीकरांनी जाणीव ठेवावी. त्यामुळे दूधगंगा योजनेतून इचलकरंजीकरांना एक थेंब पाणी मिळणार नाही. यासाठी मी आपल्या सर्वांसोबत आहे,त्यासाठी रस्त्यावर व सभागृहात दोन्ही ठिकाणी भांडण्यासाठी मी सदैव तयार आहे. मग सरकार कोणाचीही असो. शिरोळ तालुक्यातील आम्ही सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी संघटित राहून संघर्ष करू, असेही आमदार यड्रावकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी आमदार उल्हास पाटील , भवानीसिंग घोरपडे, सुशांत पाटील, बाबासो पाटील, कर्नाटक बोरगाव येथील अण्णासो हावले , धनराज घाटगे, बबनराव चौगुले, बाळासाहेब पाटील अमोल शिवई ,मनोज कडोले, सागर कोडेकर , आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे दिपाली परीट, मिनाज जमादार, बाबासो वनकोरे, सी डी पाटील , नितीन बागे,यांनी मनोगते व्यक्त केली.नायब तहसीलदार योगेश जामदाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचा मार्गदर्शना खाली बीट अंमलदार ज्ञानेश्वर सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.आभार ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी मानले.