डिसेंबर महिन्यात होणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रभाग आरक्षणांची लॉटरी फुटली. अनेक दिग्गज नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला आहे. आरक्षणानंतर काही नगरसेवकांनी सुरक्षित प्रभागाचा शोध सुरू केला आहे. समाधानकारक प्रभाग रचना जाहीर झालेल्यांचे चेहरे उजळले होते.
राज्यातील मोठय़ा नगरपालिकेत इचलकरंजीचा समावेश होतो. या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीमुळे बहुतांशी विद्यमान नगरसेवकांना बदललेल्या प्रभाग रचनेचा दणका बसल्यामुळे त्यांना शेजारच्या मतदारसंघात घुसखोरी करावी लागणार आहे. एकूणच आरक्षण सोडत आणि प्रभाग रचना यामुळे विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांच्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेल्या कार्यकमा अंर्तगत प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये शहरातील ३१ प्रभागांचे नकाशे, व्याप्ती व चतुसीमा नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी ३१ प्रभागांच्या चतुसीमांची माहिती दिली.
मतदारांच्या संख्येनुसार अनुसूचित जाती प्रवर्गाच्या ५, १२, १३, १५, १७ आणि २० या सहा प्रभागांच्या चिठ्ठय़ा काढण्यात आल्या. प्रभाग ५, १२ आणि १३ हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. तर उर्वरित तीन प्रभाग हे अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गासाठी राहिले. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विद्यमान नगरसेवक रवी रजपुते, भाऊसाहेब आवळे, संजय केंगार यांना फटका बसला आहे. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग निश्चित करण्यात आले.
दिग्गजांना फटका
जिल्ह्यातील पालिकांचे आरक्षण पाहता नव्या प्रभाग रचनेमध्ये काही विद्यमान नगरसेवकांना पुन्हा मतदारसंघावर हक्क मिळाला आहे. तर बहुतांशी दिग्गजांना शेजारच्या मतदारसंघाची चाचपणी करावी लागणार आहे. त्यासाठी प्रभाग रचनेमध्ये प्रभागाची बदललेली भौगोलिक परिस्थिती पाहता तेथून निवडणुकीची तयारी कशी करायची असा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. गत निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेत झाली होती. यंदा ती द्विसदस्यीय करण्यात आली आहे. बहुतांशी प्रभागांच्या रचनेमध्ये फेरफार झाला असल्यामुळे काही प्रभागांचे तर अस्तित्वच संपले आहे. इच्छुकांना चतुसीमेची माहिती घेऊन मतदारसंघाची चाचपणी करावी लागणार आहे.
आरक्षण सोडतीकडे पाठ
इचलकरंजी शहर राजकीयदृष्टय़ा संवेदनशील मानले जाते; मात्र आजच्या आरक्षण सोडतीकडे शहरवासीयांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांचे मोजकेच कार्यकत्रे आणि नगरपंचायतीचे विद्यमान पदाधिकारी या सोडतीवेळी उपस्थित होते.