कोल्हापूर : साडे तीन शक्तिपीठात समाविष्ट असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारी विधिवत प्रारंभ झाला. तोफेची सलामी देण्यात आल्यानंतर मंदिरात घटस्थापना करण्यात आली. देवीची पहिली पूजा ‘सिंहासनाधीश्वरी’ या रूपात साकारण्यात आली होती. दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची लांबलचक रीघ लागली होती.
देवस्थान समिती व पोलिसांनी नेटके नियोजन केले असल्याने भाविकांना यंदा निर्बंधमुक्त दर्शनाचा लाभ घेता आल्याने त्यांच्यात आनंदाची लहर पसरली होती. श्रीपूजक शेखर मुनीश्वर यांच्या हस्ते घटस्थापना झाली. देवीच्या उत्सवमूर्तीवर मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला.भाविकांची गर्दी लक्षात घेवून अखंडितपणे दर्शन रांग सुरू राहणार असल्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी सांगितले.
मंदिर उजळून निघाले
शारदीय नवरात्रोत्सनिमित्त संपूर्ण मंदिराची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विलोभनीय सजावटीमुळं मंदिर परिसर उजळून निघाला आहे. पहिल्या दिवशी परंपरेप्रमाणे राजघराण्याच्यावतीनं मधुरिमाराजे छत्रपती यांनी घटस्थापनेनंतर देवीची ओटी भरून आरती केली.
सिंहासनाधीश्वरी रूपात पूजा
आज आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी नवरात्र अनुष्ठान प्रारंभ होतो. जगदाद्य शक्ती असलेल्या करवीर निवासिनी या आजच्या पूजेमध्ये सिंहासनावर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देत आहे, अशा स्वरूपाची सिंहासनाधीश्वरी या रूपात पूजा साकारली होती. ही पूजा अनिलराव कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी व गजानन मुनीश्वर यांनी साकारली.