कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील विविध याेजनांतर्गत ७०० काेटी खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ, लाेकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे. त्यानंतर भाजपाची विकास पर्व सभा हाेणार आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, धाेंडीराम जावळे, बाळासाहेब कलागते, श्रीरंग खवरे, बाळासाहेब माने, जयेश बुगड, शशिकांत माेहिते, संजय केंगार, शेखर शहा, बाबासाे चाैगुले, राजू भाकरे उपस्थित हाेते.
प्रशासनाकडून तयारी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते, तसेच जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत प्रथमत: शहापूर पाेलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. त्याच ठिकाणी विविध विकासकामांचा शुभारंभ, लाेकार्पण साेहळ्याचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात येईल. याची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.
फडणवीसांची दुसऱ्यांदा उपस्थिती
मुख्यमंत्री फडणवीस हे माझ्या निमंत्रणानुसार नांदणी येथील जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. तर आता पुन्हा एकदा आग्रह केल्याने ते प्रथमच इचलकरंजीत येत आहेत, असा उल्लेख करून आमदार आवाडे म्हणाले, ‘त्यांच्या हस्ते नगराेत्थान अभियान याेजनेंतर्गत ४८८ काेटींच्या भूमिगत गटारी कामांचा शुभारंभ, ९७ काेटी खर्चाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) लाेकार्पण, ३१ काेटी खर्चाच्या सहा जलकुंभ उभारणी कामाचा शुभारंभ, मुख्यमंत्री सडक याेजनेंतर्गत ५९ काेटी खर्चाच्या काँक्रीट रस्तेबांधणी कामाचा शुभारंभ, ५ काेटी खर्चाच्या दाबनलिका बदलणे कामाचा शुभारंभ, ४ काेटी खर्चाच्या शहापूर पाेलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, संजय गांधी निराधार याेजनेंतर्गत ४ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप, ५ हजारपेक्षा अधिक बांधकाम कामगारांना गृहाेपयाेगी वस्तूच्या संचाचे वाटप, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नर्सिंग काॅलेज कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.
भाजपचे शक्तिप्रदर्शन
त्यानंतर कल्लापाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्कच्या मैदानात होणाऱ्या विकास पर्व जाहीर सभेत मुख्यमंत्री भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबाेधित करतील. या सभेसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आदींची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम भरगच्च व्हावा यासाठी इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत, असेही राहुल आवाडे म्हणाले.