ना कर्ज, मागणीचा अर्ज, ना करारपत्र अशाही स्थितीत कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी ७८२ वाहनधारकांना ६५ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या प्रकारामुळे फसवणूक झालेल्या शंभराहून अधिक वाहनधारकांनी गुरुवारी येथील बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. वरिष्ठ व्यवस्थापक डी. व्ही. जाधव यांना घेराव घालून या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी केली.
कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये नुकतेच सत्तांतर झाले आहे. अविनाश मोहिते यांच्याकडील सत्तासूत्रे काढून घेऊन डॉ. सुरेश भोसले हे अध्यक्ष झाले आहेत. सत्तांतरापूर्वी संचालक मंडळांनी वाहनधारकांवर लादलेला बोगस कर्ज घोटाळा अलीकडेच पुढे आला आहे. कारखान्याने ७८५ वाहनधारकांच्या नावाने करार केला असून त्यांना प्रत्येकी ७ लाख रुपये कर्जाच्या परतफेडीच्या नोटिसा बजावल्या आहेत. ६२ कोटी रुपयांचे कर्ज भरण्याच्या नोटिसा बँक ऑफ इंडियाकडून प्राप्त झाल्याने संबंधित वाहनधारक हबकून गेले आहेत.
बँकेकडे कसलाही अर्ज केला नसताना, कर्ज काढले नसताना परतफेडीच्या नोटिसा कशामुळे आल्या आहेत, या प्रश्नाने संबंधित वाहनधारक त्रस्त झाले आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन समस्या कथन केली. सहकारमंत्र्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. यानंतर वाहनधारकांनी मुंबई येथे बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी कोल्हापुरातील विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले.
त्यानुसार, संबंधित वाहनचालक, ठेकेदार यांनी येथील बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. वरिष्ठ व्यवस्थापक जाधव यांना विविध प्रश्न उपस्थित करून भंडावून सोडले. कर्ज घेतले नसताना ते कसे लादले गेले या बाबतची कागदपत्रे वाहनधारकांनी मागितली. तसे निवेदनही बँकेला दिले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सुनील माने, भरत देशमुख, राजेंद्र पाटील, अंकुश तुपे आदींनी केले.