राजारामपुरी १२ व्या गल्लीमधील मारुती मंदिरासमोर असणाऱ्या ३० वर्षांपूर्वी जुन्या इमारतीचा काही भाग रात्री कोसळला. या दुर्घटनेमध्ये जीवित हानी झाली नाही मात्र प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. दरम्यान ही धोकादायक इमारत पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इमारत मालकांनी विरोध केला व स्वत:हून इमारत काढण्याचे आश्वासन दिले.
राजारामपुरी ई वॉर्डमधील सिसनं १४३३ पकी सुलोचना इराप्पा कुरबेट्टी यांच्या ताब्यातील इमारतीचे सर्वेक्षण महापालिकेने केले होते. सदरची इमारत ३० वर्षांहून अधिक जुनी असून इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करून घेण्याबाबतची लेखी नोटीस महापालिकेच्या वतीने कुरबेट्टी यांना ११ एप्रिल रोजी देण्यात आली होती. मात्र कुरबेट्टी यांनी ती नोटीस स्वीकारली नाही. यानंतर महापालिकेने पोस्टाद्वारे नोटीस पाठवली मात्र तीही नाकारण्यात आली.
काल रात्री कुरबेट्टी कुटुंबीय जेवण करून पाठीमागच्या बाजूस असणाऱ्या एका घरामध्ये जोपण्यासाठी निघाले होते. याचवेळी इमारतीचा मागील भाग कोसळला. मात्र घरात कोणीच नसल्याने जीवित हानी झाली नाही. सकाळी महापालिकेचे अभियंता एस. के. माने हे सदरची इमारत पाडण्यासाठी फौजफाटय़ासह गेले होते. कुरबेट्टी कुटुंबीयांनी यास विरोध केला. सदर जागेबाबत न्यायालयात दावा सुरू असून यामध्ये महापालिकेने हस्तक्षेप करू नये असा पवित्रा घेतला. सुमारे दोन तास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुरबेट्टी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कुरबेट्टी कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी स्वत:हून इमारत रिकामी करण्याचे आश्वासन दिले. यानंतर महापालिकेचे अधिकारी परतले.