कोल्हापूर : आजची देशातील एकूण परिस्थिती पाहता आपण प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिलो आहोत. देश धर्मराष्ट्र होण्याच्या दिशेने पावले टाकत असून, संविधान कधीही बदलले जाऊ शकते अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रतिक्रांतीला फक्त बुद्धांचा विचारच रोखू शकतो असे प्रतिपादन साहित्यिक व विचावंत ॲड. कृष्णा पाटील यांनी केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तथागत बुध्दांच्या धम्म विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आयोजित राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा : आमदार पी. एन. पाटील यांचे उचित स्मारक उभारणार – सतेज पाटील

तत्पूर्वी वर्णव्यवस्थेची उतरंड समतेच्या सरळ रेषेत ठेवून अनोख्या आणि वैचारिक पद्धतीने दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचे ॲड. कृष्णा पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बहुचर्चित निर्मिती फिल्म क्लब निर्मित आरक्षण : दुसरी बाजू…! या मराठी लघुचित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लेखक व विचारवंत लक्ष्मण माळी यांच्या अध्यक्षतेखालील या विश्व धम्म परिषदेमध्ये आम्रपाली बुद्ध विहार बुद्धवनचे प्रमुख भदंत एस. संबोधी थेरो, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एस. पी. दीक्षित यांना धम्मसंगिती जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ॲड. करुणा विमल, अनिल म्हमाने, प्रा. शहाजी कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, किशोर खोबरे, प्रा. टी. के. सरगर, निती उराडे यांची भाषणे झाली.

हेही वाचा : पेनाच्या दुनियेतील किमयेची अनोखी सफर अनुभवण्यास कोल्हापूरकरांची गर्दी

सदर परिषदेत विश्वासराव तरटे (कोल्हापूर), प्रा. देवदत्त सावंत (लातूर), चैताली पवार (धुळे), प्रा. सदानंद सुर्वे (वाशिम), प्रा. गुलाब साबळे (वाशिम) यांना राष्ट्रीय धम्मसंगिती पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले आहे. सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर तर आभार अरहंत मिणचेकर यांनी मानले.