कोल्हापूर : नागपूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादनात बदल करून नवा मार्ग आखला आहे. त्यात विहिरी, कूपनलिका आदी जलस्रोतांची हानी होणार असल्याने या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या भारतीय किसान संघाने पत्रकार परिषदेत दिली.

संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे, शिरोळ तालुका अध्यक्ष शीतल पाटील यांनी सांगितले की, या महामार्गासाठी भूसंपादनाचे काम सन २०१२-१६ या कालावधीत झाले. या प्रकल्पासाठी आतापर्यंत ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून त्यासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. रस्ता करण्यासाठी तमदलगे, उमळवाड परिसरात मार्गावरील घरे पाडण्यात आली.

राजकीय दबावापोटी बदल

तथापि, आता तमदलगे, उमळवाड परिसरात राजकीय दबावापोटी रस्ता मार्गात बदल करण्यात आला आहे. परिणामी या गावातील ३० एकर सुपीक जमीन नष्ट होणार आहे. १९ विहिरी, ३५ कूपनलिका कायमच्या बुजल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याने राज्य शासन, केंद्र सरकार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित काम कंपनी यांच्याकडे दाद मागितली. त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याने जनहित याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चेतन खोंद्रे, नरसगोंडा पाटील, पीरगोंडा पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.