कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात शनिवारी वातावरण वेगळेच होते. काळकोठडीत एकाकी जीवन कंठणाऱ्या कैद्यांना आज नातलगांची गळाभेट घेता आली. सुख-दुखाच्या आठवणींचा कढ  काढत गप्पा रंगल्या आणि शेवट झाला तो दुरावलेल्या कुटुंबीयांशी गोडधोड खात. त्यानंतर हात उंचावले गेले ते पुन्हा एकदा अशाच एका ‘गळाभेट’ कार्यक्रमात भेटण्याचे अभिवचन देत.

येथील कळंबा कारागृहात आज भल्या सकाळपासून बरेचसे कैदी कारागृहाच्या दरवाज्याकडे डोळे लावून बसले होते. त्यांना ओढ लागली होती ती आपल्या काळजाच्या तुकडय़ाला हृदयाशी कवटाळण्याच्या संधीची. कळंबा कारागृहातील दीर्घकालीन कैद्यांशी आपल्या मुलांशी गळाभेट घेण्याचे कारागृह प्रशासनाने आयोजन केले होते. प्रशासनाने कैद्यांची त्यांच्या मुलाशी कळंबा कैदी गळाभेट घडवून आणण्याची ही दुसरी वेळ. गेल्या नोव्हेंबर महिन्यात पहिली गळाभेट झालेली. कारागृह अधीक्षक शरद शेळके, तुरुंग अधिकारी चंद्रकांत आवळे, एच. एल. आडे, यू. एन. गायकवाड, सतीश गायकवाड व कर्मचारी यांनी नियोजनबध्द २१२  पुरुष व ८ महिला कैद्यांशी त्यांच्या ४१७ मुलांशी गळाभेट घडवून आणली. दोन वर्षांच्या आतील मुलांना त्यांच्या आईसोबत तर २ ते १६ वर्षांच्या मुलांस स्वतंत्रपणे कैद्याशी थेट भेट दिली.

आपला बाप किंवा आई बाहेर कामाला गेलेले नाहीत तर ते तुरुंगात आहेत ही कल्पनाच मुलांना अस्वस्थ करणारी. तरीही भेटीची ओढ मात्र तितकीच. म्हणून गळ्यात पडल्यानंतर अश्रूंना वाट मोकळी करून दिल्यानंतरचा संवादही तितकाच भावनाविवश करणारा ठरला. ‘चुकीचे काही करू नका, मी चुकीचे केले म्हणूनच येथे आलो, शिकून मोठे व्हा, मी लवकरच घरी येईन.’  असे संवाद उपस्थित कारागृहातील उपस्थितांच्या भावनेला हात घालत होते. शिवाप्पा हा कैदी आपल्या तीन मुलांना भेटला तेव्हा त्याने तिघांनाही पेन भेट देत अधिकाधिक  शिक्षण घेण्याचा वेगळा संदेशच दिला.