अल्पकाळात २५ कोटी विश्वविक्रमी ध्वजांची निर्मिती

‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय पातळीवर राबवल्या जात असलेल्या उपक्रमामुळे देशात अल्पकाळात विक्रमी संख्येने तिरंगा ध्वजाची निर्मिती झाली आहे.

अल्पकाळात २५ कोटी विश्वविक्रमी ध्वजांची निर्मिती
गार्मेट उद्योगात तिरंगा ध्वजनिर्मितीचे काम सुरू असताना.

दयानंद लिपारे

कोल्हापूर : ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय पातळीवर राबवल्या जात असलेल्या उपक्रमामुळे देशात अल्पकाळात विक्रमी संख्येने तिरंगा ध्वजाची निर्मिती झाली आहे. यातून गार्मेट उद्योगाला मोठा आर्थिक दिलासा तर मिळालाच परंतु मंदीच्या काळात मोठा रोजगारही उपलब्ध झाला आहे. यापूर्वी ‘पीपीई किट’ उत्पादनात या उद्योगाने मोठी भरारी घेत जगाला भारताची दखल घ्यायला लावली होती. गार्मेट क्षेत्रातील उद्योजकांच्या माहितीनुसार या क्षेत्राने आतापर्यंत देशात सुमारे २५ कोटी तिरंगा ध्वजांची निर्मिती केली आहे.

 तिरंगा ध्वजनिर्मितीच्या बाबतीत ही भारतीय गार्मेट उद्योगाने अशीच नेत्रदीपक कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक घरावर राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी सुमारे कोटय़वधी ध्वजांची गरज लागणार आहे. याचे महत्त्व लक्षात घेऊन पॉलिस्टर ध्वजासाठी जीएसटी कर माफ करण्याचा निर्णय केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला आहे.

 देशात कमी काळामध्ये मोठय़ा प्रमाणात तिरंगा ध्वजनिर्मिती करणे हे गार्मेट उद्योगासमोर आव्हान होते. मात्र ते या क्षेत्राने लीलया पेलले असल्याचे दिसत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र तिरंगा ध्वज उपलब्ध झाले आहेत. गार्मेट क्षेत्रातील उद्योजकांच्या माहितीनुसार देशात सुमारे २५ कोटी तिरंगा ध्वजांची निर्मिती झाली आहे. एखाद्या देशात कमी काळात इतक्या मोठय़ा प्रमाणात ध्वजांची निर्मिती होणे आणि तो घरोघरी फडकवला जाणे हा एक विश्वविक्रम ठरेल, असेही सांगितले जात आहे.

आर्थिक उलाढाल वाढली

पंतप्रधानांच्या या उपक्रमामुळे गार्मेट उद्योगाला चालना मिळाली आहे. देशातील हजारो गार्मेट उद्योगात तिरंगा ध्वजाच्या निर्मितीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. लाखो कामगारांनाही यातून रोजगाराची निर्मिती झाली. गार्मेट उद्योजकांनाही यातून आर्थिक आधार मिळाला आहे, असे ‘द क्लोदिंग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे सचिव चंद्रशेखर यांनी सांगितले. वस्त्रोद्योगातील आर्थिक उलाढाल लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कोल्हापूर : महापुरावर कायमस्वरुपी तोडगा काढणार – एकनाथ शिंदे
फोटो गॅलरी