कोल्हापूर: कोल्हापूरकरांची शहरातील रस्त्यांबद्दल नेहमीच तक्रार असते. आता किमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानउघाडणी केल्यानंतर तरी महापालिका प्रशासन प्रमुखांनी रस्ते कामात सावळा गोंधळ घालणाऱ्या मक्तेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे मनपाचे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करीत ठाकरे सेनेच्यावतीने मंगळवारी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. गणरायाच्या उत्सवात तरी चाळण झालेले रस्ते दुरुस्त करा अन्यथा ‘ जवाब दो या चले जाओ’ असा इशारा आयुक्तांना देण्यात आला.
राज्य शासनाने कोल्हापूर महापालिकेला १०० कोटींचा निधी रस्ते कामासाठी दिला आहे. या अंतर्गत झालेले रस्ते लगेचच खराब झाले आहेत. या विरोधात आज ठाकरे सेनेने प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा दिला दिला. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली. निकृष्ट रस्त्यांचा कोल्हापूरकर, पर्यटकांना त्रास सहन करावा लागत असून अनेक अपघात होत आहेत. याला सर्वस्वी प्रशासकांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे, असा आरोप उपनेते संजय पवार यांनी केला. कोट्यवधी रुपये कोल्हापुरातील रस्त्यांसाठी खर्च केले जातात, परंतु ही भलीमोठी रक्कम कोठे मुरली जाते हा प्रश्न पडला आहे.
कोल्हापूरकरांना दर्जेदार पायाभूत सुविधा देण्यास प्रशासक असमर्थ आहेत. ८६ लाखांचा ड्रेनेज घोटाळा सुद्धा उघडकीस आल्यानंतर नेहमीप्रमाणे छोट्या माशांचा बळी दिला गेला. या मध्ये गुंतलेल्या मोठ्या माशांचे पुढे काय झाले याचे प्रशासकांनी उत्तर द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ज्या ठेकेदारांमुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊन मुदतीच्या पूर्वी रस्ते खराब झाले त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकावे. ज्या विभागीय अधिकाऱ्यांची रस्ते दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी असते, अशा कामचुकार व निष्क्रिय अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी., अशी मागणी उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणेयांनी केली.
यावेळी विराज पाटील, मंजीत माने, अवधूत साळोखे, विराज ओतारी, प्रशांत नाळे, राजू यादव, चंदू भोसले, रविभाऊ चौगुले, संतोष रेडेकर, रणजीत आयरेकर, अरुणा अबदागिरी स्मिता सावंत, दिलीप देसाई, संजय जाधव, युवराज खंडागळे, निलेश माने, संतोष रेडेकर, महेश साळोखे, बाजीराव जाधव, धनाजी दळवी शौनक भिडे, इंजमाम मुल्ला, अक्षय घाटगे, योगेश शिंदे, रितेश पाटील, छोटू करंजीकर, कुलदीप डकरे, अमित पै,तानाजी पोवार, सुमित मेळवंकी यांच्यासह शिवसैनिक नागरिक सहभागी झाले होते.