कोल्हापूर : समाजकारण, राजकारण आणि कलाकारण या क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने आमूलाग्र बदल घडवून आणणारे कोल्हापूरचे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्याही दृष्टीने अतिशय महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्याचा वेध घेणाऱ्या ‘राजर्षी’ या विशेषांकाचे प्रकाशन गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे समारंभपूर्वक होत आहे. ‘लोकसत्ता’तर्फे हा विशेषांक तयार करण्यात आला आहे.
छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि संतसाहित्याचे आणि इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. हे दोघेही उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
विकासाच्या वाटा नाकारल्या गेलेल्या समाजातील वर्गाच्या जगण्याच्या स्तरांना उंचावण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी कार्य केले. त्यांचे हे प्रयत्न महाराष्ट्राच्या प्रगतीचे द्योतक होते. वंचितांना ज्ञानाच्या वाटेवर नेऊन त्यांना विकासात सहभागी होण्याची संधी मिळवून देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळेच ‘रयतेचा राजा’ असे बिरूद त्यांना प्राप्त झाले. समाजकारणाबरोबरच कोल्हापूर ही कलांची राजधानी होण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले.
समाजाशी सर्व पातळ्यांवर नाळ जुळलेल्या या असामान्य राजाच्या अनेकांगी कर्तृत्वाची ओळख करून देणारे नामवंतांचे लेख ‘राजर्षी’ या विशेषांकात समाविष्ट करण्यात आले आहेत. हा विशेषांक संग्राह्य तर असेलच, परंतु नव्या पिढीला छत्रपती शाहू महाराज यांच्या उत्तुंग कार्याची ओळख करून देणाराही असेल.
मुख्य प्रायोजक : भारती विद्यापीठ, पुणे सहप्रायोजक : ग्रॅव्हिटस फाउंडेशन