एकेकाळचे घनिष्ठ मित्र राजकीय आखाडय़ात वैरी

  • शेट्टींचा शेवट मीच करणार – इति सदाभाऊ खोत.
  • खंडणीबहाद्दरांचे कारनामे उघड करू – राजू शेट्टी.

जेमतेम दीडेक वर्षभरापूर्वी हातात हात घालून फिरणाऱ्या दोघा घनिष्ठ मित्रांची ही ताजी भाषा. एकमेकांचे राजकारण संपुष्टात आणण्याचा इरादा स्पष्टपणे व्यक्त करणारी. होळीपूर्वीच राजकीय शिमगा सुरू झाल्याचे दाखवणारी. याच राजकीय तमाशाचा शेवट मात्र लोकसभा निवडणुकीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दर्शवणारी. हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांनी दंड थोपटले आहेत. या मतदारसंघात होणारा निकाल हाच कोणाची जिरली आणि कोणाची जीत झाली हे स्पष्ट करण्यास पुरेसा ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवारातून संसदेत जाण्याची तयारी राजू शेट्टी यांनी चालवली आहे. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेपासून फारकत घेतल्यानंतर शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. सोबत होती सदाभाऊंच्या बुलंदी तोफेची. शेतकरी प्रश्नांवर रान उठवणारी ही जोडगोळी बळीराजाच्या गळ्यातील ताईत बनली. मात्र बदलत्या राजकीय घटनाक्रमात हे दोघे मित्र भलतेच दुरावले आहेत. इतके की राजकारणातून उठवण्याची टोकाची भाषा बोलली जात आहे. मात्र कोण कोणावर मात करणार याचा निर्णायक फैसला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होणार असे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे. गेल्या चार दिवसांतील शेट्टी-खोत यांनी परस्परांना उद्देशून केलेली विधाने हेच दर्शवणारी आहेत.

हल्ला – प्रतिहल्ला

माढा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुर्डुवाडी येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर गाजरे, तूर टाकली. काळे झेंडे दाखवली. खोत यांच्या ताफ्यातील गाडी फोडली आहे. याला प्रत्युत्तर देताना खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर, इचलकरंजी येथील कार्यालयावर हल्ला चढवला. या दोन घटनांतून नव्या वादाची होळी पेटली आहे. खोत यांनी लोकसभा निवडणुकीनंतर माढा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तेथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. एकेकाळी शेतकऱ्यांचा प्राण असणाऱ्या सदाभाऊ  खोत यांना शेतकऱ्यांपासून स्वत:च्या बचावासाठी पोलीस फौजफाटा घेऊन फिरावे लागत आहे, हाच काळाने त्याच्यावर उगविलेला सूड असल्याच्या कडवट प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्य म्हणजे, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनत चालले असताना कृषी राज्य मंत्री खोत हे प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा सूर व्यक्त होत आहे. अर्थात, हे सारे राजकीय आकसातून केलेले आरोप असल्याचे खोत यांचे म्हणणे आहे. इतक्यावर न थांबता त्यांच्याकडून शेट्टींचा शेवट मीच करणार असे विधान केले गेले. हेच विधान दोघा मित्रांचा सामना थेट लोकसभा निवडणुकीत होईल, असा इशारा देणारे आहे.

निर्णायक ठरणारा आखाडा लोकसभेचा

राजू शेट्टी यांनी दुसरी लोकसभा निवडणूक भाजपच्या महायुतीमधून लढवली. केंद्र आणि राज्याच्या सत्तेत ते सहभागी झाले. मात्र विद्यमान सरकारकडून अपेक्षाभंग झाल्याचा आरोप करून शेट्टी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिठ्ठी दिली. तेव्हापासून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिकच आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, राज्याच्या कर्जमाफीतील दोष, शेती मालाला हमी भाव, वीज – पाणी प्रश्न, कापूस, ऊस, डाळी, फळ – भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी या विषयावर त्यांनी देशभरातील दीडशेवर शेतकरी संघटनांना एकत्र करून नवी दिल्लीला धडक मारली. यामुळे केंद्र-राज्य शासनाच्या शेतकरी विषयक धोरणाविरोधात संताप व्यक्त करू लागला आहे. परिणामी सत्ताधाऱ्यांच्या रडारवर राजू शेट्टी न येतील तर नवल. शेट्टी यांचा लोकसभेचा मार्ग रोखून धरण्याला भाजपकडून प्राधान्य दिले जात आहे. तशी आखणीही होऊ  लागली आहे. त्यासाठी सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. मात्र लढतीसाठी पुढे येणारी नावे तुल्यबळ दिसत नाहीत. त्यातच आता सदाभाऊ  खोत यांनीच शेट्टींविरोधात दंड थोपटले आहेत. शेट्टींचा शेवट करणार, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. हे कमी काय म्हणून त्यांचे सुपुत्र सागर यांनी निवडणूक जातीय पातळीवर जावी अशी व्यूहरचना करण्याला हात घातला आहे. ‘एक मराठा लाख मराठा’ हा संदेश देत त्यांनी खासदार बहुजन समाजाचा हवा, असे मत समाज माध्यमातून मांडण्यास  सुरुवात केली आहे. सागर यांच्या पोस्टवरून समाज माध्यमात उलटसुलट चर्चेला जोर चढला आहे. निवडणुकीला जातीय वळण देण्याचा प्रयत्न उघडपणे दिसत आहे. शेट्टी हे जैन असल्याने त्यांना मराठा समाजाने सहकार्य करू नये, अशी भूमिका घेतली जात आहे. कालपर्यंत शेट्टी यांची जात-धर्म दिसला नाही, आता सत्तेची ऊब मिळाल्यावर अशा उठाठेवी सुरू केल्या आहेत का, अशा प्रतिप्रश्नाने कलगीतुरा रंगात आला आहे. लोकसभा निवडणूक होईपर्यंत अशा प्रकारच्या चर्चा-वादाला ऊत येणार याची प्रचीती आतापासूनच येऊ  लागली आहे.

बदलती राजकीय समीकरणे

  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून फारकत घेतलेले राजू शेट्टी यांनी नवे मित्र जोडण्यास सुरुवात केली आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापासून ते उभय काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांपर्यंत शेट्टी यांचा संपर्क वाढला आहे.
  • दोन्ही काँग्रेसच्या गोटातून शेट्टीविषयीची कटुताही कमी झाली आहे. शिवाय, शिवसेनेशीही शेट्टी यांचे संबंध सुधारले आहेत.
  • शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेवेळी शिवसेनेने चांगली सरबराई केली होती.
  • अलीकडेच शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणूक स्वतंत्र लढवण्याची भूमिका जाहीर आहे. हा बदल पाहता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शेट्टी यांना पाठिंबा देण्याची शक्यता वाढीस लागली आहे.
  • त्याबदल्यात शेट्टी यांनी राज्यभरात शिवसेनेला सहकार्य करण्याचे घाटत आहे.
  • हे बदलते समीकरण शेट्टी त्यांच्यादृष्टीने बेरजेचे राजकारण साधणारे आहे.
  • त्यामुळे भाजप सदाभाऊ खोत यांना आखाडय़ात उतरवून दोन मित्रांची लढाई पाहणार का हा प्रश्न आहे.
  • तसे झाल्यास शेतकऱ्यांचे नेतृत्व कोणाकडे याचाही फैसला होणार आहे.