कोल्हापूर : निवडणूक प्रतिज्ञापत्राशिवाय इतरत्र आणखी कोठे मालमत्ता असेल तर ती आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह आव्हान देणाऱ्या कोणीही ती घेऊन जावे, असे प्रतिआव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी दिले.
शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करताना एका आंदोलनावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची ५०० एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. त्यावर शेट्टी यांनी अशी कोणती जमीन असेल तर त क्षीरसागर यांच्या नावावर करण्यासाठी बिंदू चौकात येत आहे, असे आव्हान दिले होते. त्यानुसार भर पावसात शेट्टी कार्यकर्त्यांसमवेत या ठिकाणी दोन तास थांबून राहिले होते. राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आमदार क्षीरसागर आले नसल्याने शेट्टी यांनी कार्यकर्त्यांच्या साक्षीने बक्षीसपत्रावर सह्या करून ते कधीही येऊन घेऊन जाण्याचे प्रतिआव्हान क्षीरसागर यांना दिले.
यावेळी शेट्टी म्हणाले, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेच्या पाच निवडणुका लढवल्या. माझ्याकडे असलेली गाडी लोकवर्गणीतून देण्यात आली आहे. गाडी घेण्यासाठी माझ्यावर आयआरबीच्या कंपनीसमोर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली नाही. कोणत्याही बहुउपचार रुग्णालयाच्या डॉक्टर, विकसक, शासकीय कार्यालयातील खातेप्रमुख, औद्योगिक वसाहतीतील उद्योजकाकडून बगलबच्चांना पाठवून हप्ते गोळा करण्यासारखी परिस्थिती माझ्यावर ओढवली नाही. महापालिकेतील मोक्याच्या जागेवर आरक्षण टाकून जमिनी लाटल्या नाहीत. यामुळे राजेश क्षीरसागर यांनी माझ्या संपत्तीची कधीही चौकशी करावी, असा टोला त्यांनी लगावला.
ठाकरे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, सुनील मोदी, सचिन चव्हाण, जयकुमार कोले, संदीप राजोबा यांच्यासह स्वाभिमानी व शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.