ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक होण्यापूर्वीच वादाचे पडघम वाजत आहेत. उद्या शुक्रवारी ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक घेण्याचा घाट अधिकार्यांनी घातला असून ती रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे गुरुवारी केली. मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक झाल्यानंतरच ही बैठक व्हावी, असेही त्यांनी सुचवले आहे.
याबाबत शेट्टी यांनी मेहता यांच्याशी पत्रव्यवहार करताना म्हटले की, उद्या मुंबईमध्ये ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक घेण्याचा घाट अधिकार्यांनी घातला आहे. मात्र, या ऊस दर नियंत्रण मंडळामध्ये शेतकर्यांचे तसेच साखर कारखान्यांचे प्रतिनिधी नाहीत. या बैठकीत शेतकर्यांचे प्रश्न मांडता येणार नाहीत. थकीत एफआरपीवर चर्चा होणार नाही.
साखर कारखान्याच्या खर्चाच्या ७०-३०च्या फॉर्म्युल्यावर निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे त्यावर अधिकार्यांनी परस्पर निर्णय घेऊ नये. या प्रश्नांवर केवळ शासकीय प्रतिनिधींनी ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक घेणे चुकीचे आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप एफआरपी दिलेली नाही. अन्य काही प्रश्न आहेत, त्यामुळे ही बैठक रद्द करावी. तसेच ऊस दर नियंत्रण मंडळावर अशासकीय सदस्यांची प्रथमतः नेमणूक करूनच बैठक बोलविण्यात यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.