कोल्हापूर : देशात पेट्रोलमध्ये इथेनॅाल मिश्रण करण्यात येऊ नये तसेच इथेनॅालशिवाय पर्यायी इंधन वापरण्याची मुभा द्यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आलेली होती. सदर याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई व न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन या खंडपीठाने फेटाळली. यामुळे देशातील पाच कोटी ऊसउत्पादकांना दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.
देशातील क्रुड ॲाईलचा व्यापार करणारे व्यापारी , काही परदेशी बनावटीच्या गाड्यांच्या कंपन्याच्या वतीने पेट्रोलमध्ये इथेनॅाल मिश्रण करण्यात येऊ नये याकरिता सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आली होती. सध्या भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॅाल मिश्रित केले जात आहे. भारतात धान्य व उसापासून जवळपास १६८५ कोटी लिटर इथेनॅालचे उत्पादन घेतले जात आहे. देशातील मूठभर क्रुड ॲाईलचे व्यापारी व काही वाहन कंपन्यांनी हेतुपूर्वक स्वत:च्या स्वार्थासाठी इथेनॅालबाबत गैरसमज पसरवित आहेत, असे शेट्टी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॅाल धोरणास चालना दिल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये परकीय चलनाची १ लाख ४४ हजार कोटींची बचत झाली आहे. इथेनॅालच्या वापरामुळे देशामध्ये जवळपास ७३६ लाख टनांनी कार्बनचे उत्सर्जन घटले असून, ते ३० कोटी झाडे लावण्याच्या बरोबरीत आहे. इथेनॅाल निर्मितीमुळे देशातील शेतकऱ्यांना याचा थेट लाभ झाला असून, ऊस, मका व धानउत्पादक शेतकऱ्याच्या मध्ये सर्वाधिक ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. इथेनॅाल निर्मितीमुळे साखर उद्योग स्थिरावल्यामुळे ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून, दर वर्षी यामुळे ४० हजार कोटी थेट ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मिळू लागले आहेत, असे त्यांनी सांगितले.
ब्राझील, अमेरिका यांसारख्या प्रगत राष्ट्रातील वाहनांच्या इंधनामध्ये सर्रास इथेनॅालचा वापर केला जात असताना, भारतामध्ये यावर बंदी घालणे म्हणजे कूटनीतीचा भाग आहे. यामुळे सदरची आव्हान याचिका फेटाळून भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई व न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने देशातील ऊस, धान व मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेबरोबरच ग्रामीण, पर्यावरण व कृषी क्षेत्रामध्ये दूरगामी फायदे होणार आहेत, असा उल्लेख राजू शेट्टी यांनी केला.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी जून २०२२ मध्ये पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण वेळापत्रकापूर्वी साध्य केले. हा आकडा २०२२-२३ मध्ये १२ टक्के, २०२३-२४ मध्ये १४ टक्के आणि चालू २०२४-२५ मध्ये ३१ जुलै पर्यंत १९.०५ टक्के पर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे केवळ जुलै मध्ये मिश्रण प्रमाण १९.९३ टक्के पर्यंत पोहोचले.