कोल्हापूर : राज्यसभेच्या सहा जागेतील तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केली आहे. धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी विरोधकांची मते फुटतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. यातून भाजपची लढत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांच्याशी होण्याची चिन्हे आहेत. धनंजय महाडिक विरुद्ध संजय पवार असा कोल्हापुरातील दोन मल्लांमध्ये सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यसभा निवडणुकीचा विषय सुरू झाल्यापासून या ना त्या कारणाने कोल्हापूर सतत चर्चेत राहिले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यावर कोल्हापूर चर्चेत आले. तर शिवसेनेने अनपेक्षितपणे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मैदानात उतरवले. शिवसेनेच्या या राजनीतीला शह देण्यासाठी भाजपनेही कोल्हापुरचाच उमेदवार आखाडय़ात उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्यात आला आहे.
मैत्री आणि सामना
महाडिक यांना विजयासाठी पक्षाशिवाय १२ मतांची आवश्यकता आहे. विरोधकांची १० मते फुटणार असल्याचा दावा करीत महाडिक यांनी आपला विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दावे झ्र् प्रतिदावे पाहता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातीलच दोन मल्लांमध्ये लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे पवार व महाडिक हे वेगवेगळय़ा आणि एकमेकांशी अंतर राखून असलेल्या पक्षात असले तरी व्यक्तिगत पातळीवर मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे वेगळय़ा अर्थाने मैत्रीपूर्ण सामना पाहायला मिळणार आहे.
खासदारकीसाठी महाडिक चौथ्यांदा रिंगणात
धनंजय महाडिक यांनी विधानसभा, लोकसभा अशा दोन्ही निवडणुका लढवल्या आहेत. पण ते प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत राहिले आहेत. २००४ साली त्यांनी प्रथम शिवसेनेकडून लोकसभा लढताना सदाशिवराव मंडलिक यांच्याशी टक्कर घेतली होती. या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून २०१४ साली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. दिल्लीत ते शरद पवार समर्थक म्हणून ओळखले जात असले तरी गल्लीत मात्र त्यांचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी सख्य राहिले. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुढे त्यांच्यासह महाडिक परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच भाजपने राज्यसभेचा तिसरा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष असलेले धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार अशा कोल्हापूरच्या दोन मल्लांतील नवी दिल्लीला नेणाऱ्या आखाडय़ात कोण बाजी मारणार हे लक्षवेधी ठरले आहे.