गुन्हेगारीचा शिक्का बसल्याने त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास टाळाटाळ होते पण न्यायालयीन बंदीच्या हातावर राखी बांधत गुरुवारी आगळ्या प्रकारे राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. तब्बल १२९ बंदिजनांनी आज हातावर राखी बांधलेली मनगटे उंचावत.. आता ही मनगटे उठतील तर चांगल्या कामासाठीच अशी शपथ घेतली आणि वातावरण भावनिक झाले. आयुष्यात कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यांनी बरबटलेले राकट हात आज एका ‘राखी‘ पुढे लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘रक्षाबंधन‘ उपक्रमाचे आयोजन केले होते. या हळव्या उपक्रमाला साथ दिली शहाजी लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनींनी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश आर.एस. निंबाळकर होत्या. कार्यक्रमाची सुरुवात १२९ न्यायालयीन बंदी व २२ तुरुंग कर्मचारी यांना सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत राखी बांधून करण्यात आली.परिस्थितीच अशी होती की आमच्याकडून चुका झाल्या. पण आज या भगिनींनी आमच्या मनगटावर राखी बांधून आम्हीही माणूस असल्याची जाणीव करुन दिली, जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे.
भागीरथी महिला संस्थेचीही राखी पौर्णिमा
महिला सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या भागीरथी महिला संस्थेच्यावतीने आज कळंबा मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन कार्यक्रम झाला. संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक व सहकारी महिलांनी बंदिजनांना राखी बांधली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.