कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या शहर अभियंतापदाचा खो-खो राजकीय आशीर्वादातून सुरू राहिल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. कार्यकारी अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे असलेली ही जबाबदारी बुधवारी सायंकाळी उपशहर अभियंता रमेश मस्कर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यामागे पडद्यामागे जिल्ह्यातील मंत्री, माजी खासदार आणि महापालिकेचे पुरेपूर राजकारण करणाऱ्या नगरसेवकांचा हस्तक्षेप असल्याची चर्चा आहे.
कोल्हापूर महापालिकेत काही अधिकाऱ्यांनी मलईदार जागेवर अनेक वर्षे ठाण मांडले आहे. नियमाप्रमाणे त्यांची बदली करणे अपेक्षित असताना महापालिकेतील सर्वोच्च अधिकारी याकडे दुर्लक्ष करून किरकोळ कारणावरून अधिकाऱ्यांना दंड करणे, नोटीस लागू करणे यात मश्गूल आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन अधिकाऱ्यांचा कोणता मोहरा कोठे ठेवायचा याच्या राजकीय हालचालींना गती आल्याचे गेल्या वर्षभरात दिसले आहे.
माझा निधी माझा अधिकारी
ज्या लोकप्रतिनिधींनी निधी आणला आहे त्यांना सोयीचे मक्तेदार नेमण्यासाठी जवळचा अधिकारी हवा असतो. टक्केवारीचा मेवा सहजपणे चाखता यावा हे यामागचे इंगित असते. यामुळे बड्या राजकीय नेत्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची जणू सुपारी घेतल्याची चर्चा रंगली आहे. कोल्हापूरसाठी १०० कोटीचा रस्ते निधी आणल्यानंतर याची प्रचिती आली होती. तेव्हा महापालिकेतील सर्वांत मलईदार नगर अभियंता पदावर अनेक वर्ष ठाण मांडून बसलेले नेत्रदीप सरनोबत यांना गतवर्षी रातोरात हटवून हर्षजित घाटगे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. तेव्हा मुख्यमंत्रिपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापुरातील रस्त्याची खराब स्थिती लक्षात आल्यानंतर ही बदली झाली होती. यामागे माझा निधी माझी जबाबदारी असे अनेक नेतृत्वाचे ‘नियोजन’ गणित दिसून आले.
खेळ रंगला
नंतर पुन्हा राजकीय घडामोडी घडून सरनाईक यांना या पदावर पुन्हा विराजमान करण्यात आले. आता ते निवृत्त झाल्यानंतर घाटगे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. परंतु त्यास तीन महिने होण्याच्या आतच आता उपशहर अभियंता रमेश मस्कर यांच्याकडे ही खुर्ची सोपवण्यात आली आहे. यासाठी पडद्यामागे बड्या राजकीय नेत्यांनी हालचाली केल्याची चर्चा आहे. यातून महापालिकेतील शहर अभियंतापदाच्या आट्यापाट्याचा खेळ सुरूच राहिला आहे.
राजकीय साठमारीचा फटका
या निवडीवरून महापालिकेचे राजकारण करणारा सत्ताधारी दुसरा गट आता सक्रिय झाला असून तो घाटगे यांच्याकडे ही खुर्ची देण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. जनसुराज्य शक्ती पक्षात असलेले माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी मस्कर यांची ही नियुक्ती अयोग्य पद्धतीने झाली आहे. त्यामागे बड्या राजकीय नेत्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मस्कर यांच्या नगर रचना विभागातील कार्यपद्धतीवरून भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी, आरोप झाले आहेत. त्यावरून दोन वेळा चौकशी झाली असतानाही या भ्रष्ट अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी कशी दिली याबाबत प्रशासकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. तर, रमेश मस्कर यांनी आपल्यावर होणारे आरोप फेटाळले असून आपली कसलीही चौकशी, तक्रारी नसल्याचे म्हटले आहे. कनिष्ठ अभियंता असतानाही १७ वर्षे उपशहर अभियंता म्हणून काम केले होते. आता नगर अभियंता पदाची प्रभारी जबाबदारी देण्यात आली आहे. अधिकारी नियुक्तीचे अधिकार शासनाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तथापि या आरोप – प्रत्यारोपामुळे कोल्हापूर महापालिकेतील मलईदार नगर अभियंतापद हे राजकीय साठमारीमुळे काटेरी मुकुट बनले आहे.