इचलकरंजी-सांगली रस्ता रुंदीकरण व दुरुस्ती, मुसळे हायस्कूलचा खराब रस्ता आणि पाटील मळा येथे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या शाळकरी मुलांसह भागातील नागरिकांनी गुरुवारी सुमारे तासभर रास्ता रोको केला. यामुळे इचलकरंजी-सांगली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दहा दिवसांत रस्त्याची कामे मार्गी लावण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
इचलकरंजी-सांगली रस्त्यावर राजवाडा चौक ते जय सांगली नाका या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गावर सातत्याने वर्दळ सुरू असते. या मार्गावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे तसेच रस्ते अरुंद असल्याने वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या परिसरात असलेल्या फॉच्र्युन प्लाझामुळे रस्त्यावर लागणाऱ्या मोठय़ा वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी तर नित्याची बनली आहे.
या संदर्भात प्रशासनाला कळवूनही दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शाळकरी विद्यार्थी भागातील नागरिकांसह रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत रस्ता अडविल्याने इचलकरंजी-सांगली मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. गंभीर बाबींसाठी विद्यार्थ्यांनाच आंदोलनाचे हत्यार उपसावे लागल्याने भागातील लोकप्रतिनिधी करतात तरी काय, असा संतप्त सवालही या वेळी व्यक्त होत होता. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर गावभागचे पोलिस निरीक्षक शिवाजी कणसे यांनी आंदोलनस्थळी धाव घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेरीस अति. मुख्याधिकारी पोतदार, नगररचना व पालिकेचे अधिकारी आंदोलनस्थळी आले. या वेळी सुभाष मालपाणी यांच्यासह आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करीत यांना धारेवर धरले. वारंवार तक्रारी करून अन् बठक होऊनही पालिकेचा कारभार ढिम्मच असल्याने प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या वेळी येत्या दहा दिवसांत रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्याचे आश्वासन अति. मुख्याधिकारी पोतदार यांनी दिले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2015 रोजी प्रकाशित
खराब रस्ता, वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ इचलकरंजीत रास्ता रोको
या मार्गावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे तसेच रस्ते अरुंद असल्याने वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
Written by अपर्णा देगावकर

First published on: 27-11-2015 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasta roko protest bad road traffic jam in ichalkaranji