कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत खरिपा पाठोपाठ यंदाच्या रब्बी हंगामामध्येही शेती उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. या विभागाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३१४ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली असून पिकांच्या उत्पन्नात घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. खरिपाच्या संकटातून तोंड वर काढण्यापूर्वीच रब्बीकडून दगा मिळण्याच्या शक्यतेने ऐन दिवाळीत बळीराजाचे तोंड कडू झाले आहे.
यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली. पाण्याची समृद्धता असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यावरही दुष्काळ छाया जाणवू लागली आहे. खरिपाचे पीक निम्म्यावर आले आहे. यामुळे आता रब्बीकडे लक्ष लागले असताना तेथेही अपेक्षित प्रतिसाद मिळणार नसल्याचे जाणवू लागले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना विमा योजनेपासून काही प्रमाणात संरक्षण मिळण्याची शक्यता आहे.
याबाबत विभागीय कृषी सह संचालक नारायण शिसोदे यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत कोल्हापूर विभागात गेल्या रब्बी आणि खरीप हंगामामध्ये १ लाख ३६ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. चालू रब्बी हंगामासाठी या योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली असल्याची माहिती मंगळवारी येथे बोलतांना दिली.
राष्ट्रीय कृषी विमा योजनेसाठी रब्बी २०१४ मध्ये सातारा, सांगली जिल्ह्यातील १४ हजार ७६० तर खरीप २०१५ मध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २१ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. चालू रब्बी हंगाम २०१५ साठी राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरु ठेवण्यास शासनाने मान्यता दिली असून यामध्ये गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, करडई, सूर्यफूल आणि रब्बी कांदा या पिकांचा समावेश आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत पीक पेरणी पासून १ महिना किंवा ३१ डिसेंबर या पकी जी लवकर असेल ती अंतिम मुदत राहणार असल्याचेही शिसोदे यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत चालू रब्बी हंगामात आतापर्यंत ३१४ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली असून पिकांच्या उत्पन्नात घट येऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आíथक स्थर्य देण्यासाठी शासनामार्फत राष्ट्रीय कृषि विमा योजना, पीकनिहाय अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ, मंडळ गट किंवा तालुका, तालुका गट स्तरावर राबविण्यात येत असल्याचे सांगून शिसोदे म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2015 रोजी प्रकाशित
रब्बी हंगामामध्येही शेती उत्पादनात घट होण्याची शक्यता
खरिपाच्या संकटातून तोंड वर काढण्यापूर्वीच रब्बीकडून दगा
Written by अपर्णा देगावकर

First published on: 12-11-2015 at 03:00 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reduction in agricultural production in rabi season