दयानंद लिपारे

जिल्ह्यात डझनभर नातू राजकीय आखाडय़ात

Ajit Pawar gave a public confession Said Hooliganism in the industrial area
अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’
udayanraje bhosale, nomination, satara lok sabha 2024 election
मला उमेदवारी मिळणार हे निश्चित – उदयनराजे
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

राज्याच्या राजकारणात सध्या नातवांची चलती आहे. नातवाच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहिल्याची चर्चा आहे. तर, दिवंगत केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू डॉ. सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील चर्चेत आले आहेत. पण, हे ‘नातू’पर्व राज्याच्या सर्वच भागात झपाटय़ाने उदयाला आलेले दिसत आहे. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात तर डझनभर नातू राजकीय आखाडय़ात उतरले आहेत. त्यामध्ये राजघराण्यापासून ते लोकसभा निवडणुकीतील  शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. काही नातू आधीच विधानसभेत पोहोचले असून अजून काही नातूही येत्या वर्षभरात आमदार-खासदार झाल्याचे दिसतील अशी राजकीय स्थिती आहे.

कोल्हापूर जिल्हा हा सहकार क्षेत्रात आघाडीवर राहिला आहे. सहकाराच्या जोडीनेच राजकीय क्षेत्रात अनेक घराण्यांनी आपला पैस विस्तारला. जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकात यश मिळवून मंत्रिपदही प्राप्त केले. एका पिढीकडून दुसऱ्या आणि आता तर तिसऱ्या पिढीपर्यंत राजकारण झिरपत आले आहे. विशेष म्हणजे सर्व पक्षात आजोबा, पुत्र ते नातू असा राजकीय प्रवास झालेली अनेक मंडळी आहेत. यातून आता जिल्ह्यच्या राजकरणात ‘नातू’पर्व उदयाला आल्याचे दिसत आहे.

यंदाच्या लोकसभेच्या रिंगणात एक नातू आपले राजकीय नशीब आजमावत आहे. सलग पाचवेळा खासदार झालेले काँग्रेसचे बाळासाहेब माने यांचे नातू आणि दोनवेळा राष्ट्रवादीकडून खासदार बनलेल्या निवेदिता माने यांचे सुपुत्र, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने हे यावेळी हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेकडून लढत देणार आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नातू आणि खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र पृथ्वीराज महाडिक तसेच दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे नातू वीरेंद्र मंडलिक हे यावेळी पित्याच्या म्हणजे संजय मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा वाहत आहेत.

दोघांवर तरुणाईशी नाते जमवण्याची मोठी जबाबदारी आहे. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचा आशीर्वाद आपल्याला आहे असा दावा महाडिक-मंडलिक हे करीत आहेत, पण डॉ. पाटील यांचे नातू, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज संजय पाटील यांनी मात्र प्रचाराचा ‘धनुष्यबाण’ हाती घेतला आहे.

राजकारणात नातू सक्रिय

कोल्हापूर जिल्ह्यात आजोबा — वडील यांच्या पावलावर पाऊल ठेवत नातूही राजकारणात सक्रिय झाले आहेत. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल हे जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर दुसरे राहुल पाटील हेही जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते दिवंगत माजी मंत्री श्रीपतराव बोन्द्रे आणि पिता माजी आमदार पी. एन. पाटील यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे पुतणे, दिवंगत आमदार संजयसिंह गायकवाड यांचे पुत्र करण यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. साखर कारखानदारीमध्ये तात्यासाहेब कोरे, डी. सी. नरके यांनी काम केले. आता त्यांचे नातू राजकरणात ठसा उमटवत आहेत. नरके यांचे नातू, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांचे पुतणे चंद्रदीप नरके यांनी दोनवेळा शिवसेनेकडून विधानसभा जिंकली आहे. तात्यासाहेब कोरे यांचा नातू, माजी मंत्री विनय कोरे यांचे पुतणे विश्वेश यानेही राजकारणाचा श्रीगणेशा केला आहे.

आमदार रखमाजी देसाई, विधानसभेचे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर या आजोबा—वडिलांचा वारसा नंदिनी बाभुळकर या सध्या मातोश्री, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासमवेत चालवत आहेत. स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब खंजीरे, दिवंगत आमदार सरोजिनी खंजिरे यांचा राजकीय वारसा नातू, इचलकरंजीचे नगरसेवक राहुल खंजिरे यांच्याकडे आहे. गारगोटीचे आनंदराव देसाई यांचे नातू, माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र राहुल हे आगामी विधानसभेच्या रिंगणात भाजपचे उमेदवार असतील. पन्हाळ्याचे दिवंगत आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे नातू डॉ. जयंत पाटील पंचायत समिती सदस्य आहेत. दिवंगत खासदार शंकरराव माने यांचे नातू, कोल्हापूर चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंदराव माने यांचे पुत्र कोल्हापूरचे माजी उपमहापौर अर्जुन माने यांनी महापालिकेच्या राजकारणात जम बसवला आहे. शिरोळमधील सहकारातील नेते शामराव पाटील यड्रावकर यांचे नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे पुत्र आदित्य हे राजकीय वारसा चालवण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूरच्या राजघराण्यातील पुढची पिढी राजघराण्याचा वारसा चालवणार हे ओघानेच आले. श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे आणि युवराज शहाजीराजे, युवराज मालोजीराजे आणि यशराजे असा वारसा आहे.

घराणेशाहीवर टीका

एकाच कुटुंबात सत्ताकारण सुरू असल्याच्या प्रवृत्तीवर लोकांमध्ये संमिश्र सूर आहे. याबाबत राजकीय निरीक्षक अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांनी नाराजी दर्शवली आहे. ‘राजकारणातील घराणेशाही झुगारली पाहिजे, पण वास्तव मात्र वेगळेच आहे. आमच्यासारखे राजकारणीच ‘साहेबांना, अडचण आहे, आपणच सुपुत्राचे नाव पुढे करूया’ असे म्हणत एकापरीने घराणेशाहीला हात देतो. युवराज मंच नावाने गावागावात लागलेले फलक पाहता युवा पिढीला तरुणाईकडून पाठबळ मिळत असल्याचे दिसते, असे घोरपडे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.