कपडय़ांसह अत्तरे, सुगंधी पदार्थ, सौंदर्यप्रसाधनांची दुकाने गर्दीने फुलली

मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान ईद सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून करवीर नगरीत सणाच्या खरेदीची एकच लगबग उडाली आहे. खरेदीदारासाठी बाजारपेठ, व्यापारी सज्ज झाले असून कपड्यांसह अत्तरे, सुगंधी पदार्थ व सौंदर्यप्रसाधनांची दुकाने गर्दीने फुलून गेली आहेत. शिरखुरम्याच्या मेजवानीसाठी लागणारा सुका मेवा खरेदी करण्यास मुस्लीम कुटुंबे बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात दाखल झाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या रिपरिपीची तमा न बाळगता मोठय़ा प्रमाणात सर्व प्रकारची खरेदी केली जात आहे.

रविवारी महत्त्वाचा मानला जाणारा २७ वा रोजाचा उपवास पार पडला. महिनाभर उपवास करणे शक्य नसलेले मुस्लीम तसेच काही िहदू बांधव यांनीही हा उपवास केला. यानंतर खऱ्या अर्थाने ईदच्या खरेदीची धूम सुरू होते. रुसलेल्या पावसाने बरसण्यास सुरुवात केल्याने सर्वत्र आनंदाची लहर आहे. यामुळे    ईद सणाचे स्वागत करण्यासाठी मुस्लीम बांधवांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. महिला, युवती व लहान मुलांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढत आहे. तयार कपड्यांच्या दुकानात ईद सणासाठी खास विविध प्रकारचे आकर्षक ड्रेसेस व साड्या उपलब्ध असून युवतींकडून अनारकली, अंब्रेला अशा कमीजना आणि एंम्ब्रॉयडरी केलेल्या सलवारना, तर युवक फॅशनेबल कुत्रे व ड्रेसेसना पसंती देत आहेत.

रमजान ईदचे वैशिष्ट्य असलेल्या शिरखुरमासाठी लागणाऱ्या शेवया व  सुकामेवाची दुकाने सजली आहेत. रमजान ईदची नमाज अदा झाल्यानंतर याच शिरखुरम्याच्या मेजवानीला मुस्लीम कुटुंबामध्ये सुरुवात होते. तुपात तळलेल्या, भाजलेल्या व साध्या अशा विविध प्रकारच्या शेवया व सुकामेव्याच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी दिसत आहे. बदाम, पिस्ता, काजू, जिरोंजी, खरबूज बी, खोबरा पीस, अखरोट, मनुका तसेच सुमारे २० ते २५ प्रकारचे पेंड खजूर  दुकानामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.  मुस्लीम बांधवांची बाजारपेठेतील वर्दळ लक्षात घेऊन महापालिका, इब्राहिम खाटीक चौक, माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी मार्केट, कपिलतीर्थ मार्केट, िबदू चौक ईद फेस्टिवल, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, कदमवाडी ईद फेस्टिवल आणि कसबा बावडा येथील दुकानांमध्ये शिरखुरम्यासाठी लागणाऱ्या सुक्या मेव्याची मोठी आवक करण्यात आली आहे.

अनेक दुकानांमध्ये ५,१०,१५ लिटरमध्ये शिरखुरमा बनविण्यासाठी लागणाऱ्या सुका-मेव्याचे स्वतंत्रपणे पॅकेटच विक्रीला ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.

ईदच्या खरेदीमध्ये मुस्लीम बांधव सुगंधी अत्तरही आवर्जून खरेदी करतात. त्यामुळे विविध प्रकारच्या अत्तरानांही मागणी असून खस, काकडा, चमेली, पहाडी फूल, केवडा, मोगरा यासारखी अत्तरेही बाजारात उपलब्ध आहेत.