लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : संत बाळूमामा भंडारा उत्सवाअंतर्गत शुक्रवारी रथोत्सव मिरवणुक हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडली. बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष, भंडाराच्या मुक्तहस्ते उधळण, ढोलकैताळाच्या निनादात दीड किलोमीटर अंतरावर रथोत्सव चार तास सुरु होता.

भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे. तीच प्रथा आजही भाविकांनी कायम ठेवली आहे. राज्य, परराज्यात बाळू मामांनी जतन केलेल्या बकऱ्या बग्गी (दिड ते दोन हजार बकऱ्यांचा कळप) च्या रूपात असतात.

आणखी वाचा-अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

प्रथेप्रमाणे भंडाऱ्याच्या निमित्ताने महाप्रसादाच्या आदल्या दिवशी या सर्व बग्गी निढोरी गावात एकत्र आल्या. बगीचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. देवालयाचे मानकरी कर्णसिंह धैर्यशील राजेभोसले यांनी रथाची पूजा केली. उत्साही भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली. धैर्यशील भोसले दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंत पाटील, विजय गुरव, प्रशासकीय समिती सदस्य रागीणी खडके यांच्यासह भक्तगण उपस्थित होता.