कोल्हापूर : प्रदूषणामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली असताना त्यास कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका कारणीभूत असल्याची धक्कादायक माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी पाठवलेल्या नोटीसमधून उघडकीस आली आहे. कोल्हापूर महापालिकेचे ४२.५ दशलक्ष लीटर तर इचलकरंजी महापालिकेचे १८ दशलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रियेविना थेट पंचगंगेत मिसळत असल्याचा निष्कर्ष संयुक्त पाहणी अहवालात नमूद केला आहे.
अलीकडे पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये पुन्हा मोठी भर पडली आहे. नदीमध्ये काळेशार, फेसाळलेले, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असून मासे मारण्याचे प्रमाण वाढले आहे. नदी प्रदूषण प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली होती. त्याआधारे प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका, करवीर व इचलकरंजी प्रांताधिकारी यांच्या प्रतिनिधींनी कोल्हापूर, इचलकरंजी व शिरोळ तालुक्यामध्ये पंचगंगा नदीची पाहणी करून प्रदूषणाचे नमुने घेऊन पाहणी अहवाल तयार केला होता.
हेही वाचा – कोल्हापूर : चंद्राबाबू नायडू सपत्निक महालक्ष्मीच्या चरणी, मोदींचे सरकार येण्याचा विश्वास
कोण किती जलप्रदूषणात ?
कोल्हापूर महापालिकेचे एकूण १४९ दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाणी तयार होते. त्यातील १०६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. उर्वरित ४२.५ दशलक्ष लीटर सांडपाणी विना प्रक्रियांमध्ये सोडले जाते. इचलकरंजी महापालिकेत ३८ दशलक्ष लीटर सांडपाणी होते. त्यातील २० दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया होते. उर्वरित पाणी पंचगंगेत सोडले जाते असे अहवालात नमूद केले आहे.
हेही वाचा – उद्योगासह दरडोई उत्पन्नवाढ मंदावली
कारवाई कोणती होणार ?
त्याआधारे आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ज. शं. साळुंखे यांनी दोन्ही महापालिका तसेच उचगाव, पाचगाव, गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी व कळंबा या ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसांत उचित कार्यवाही करावी अन्यथा जल प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.